होमपेज › Sangli › शिक्षक खून : आणखी तिघांना अटक

शिक्षक खून : आणखी तिघांना अटक

Published On: Jan 16 2018 2:16AM | Last Updated: Jan 15 2018 11:46PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

येथील शास्त्री चौकात झालेल्या सुनील आंबी या शिक्षकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार, शंभर फुटी रस्त्यावरील हॉटेल डायमंडचा वेटर अशा तिघांना अटक केली. गुंड रवि खत्री याला गुरुवारपर्यंत तर अन्य दोघांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणातील संशयित प्रदीप मोरेच्या कोठडीची मुदत मंगळवारी संपत आहे. यात आणखी काहींचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी सांगितले. 

गुंड रवि रमेश खत्री (वय 29, रा. सावंत प्लॉट), वेटर राकेश सुंदर चव्हाण (वय 29, मूळ रा. विजापूर, सध्या रा. शंभर फुटी रस्ता, सांगली), सुहास ऊर्फ तम्मा श्रीकांत ऐवळे (वय 27, रा. हनुमाननगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी यापूर्वी प्रदीप मोरेला अटक केली आहे. मोरेच्या पत्नीस आंबी मोबाईलवरून फोन आणि मेसेज पाठवून सतत त्रास देत असल्याने त्याला मारल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.  

दरम्यान मोरेच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपत आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर खत्री व चव्हाण यांना गुरुवापर्यंत व ऐवळेला शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.  

सुनिल आंबी हे विश्रामबाग येथील एका शाळेत शिक्षक होते. त्याच शाळेत मोरेची पत्नी शिक्षिका आहे. गेल्या काही दिवसापासून आंबी हे मोरे यांच्या पत्नीस मोबाईलवरून फोन आणि मेसेज पाठवून त्रास देत होते. याची माहिती मिळाल्यानंतर 26 डिसेंबररोजी रात्री साडेअकराच्या सुमारास सुनील आंबी यांना मोबाईलवर फोन करून चर्चा करायचे असल्याचे सांगून शास्त्री चौकात बोलावून घेतले. 

तेथे आल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्यानंतर  शंभर फुटी रस्ता परिसरात सोडून देण्यात आले.  त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना दि. 4  जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. 

त्यानंतर आंबी यांच्या नातेवाईकांनी शनिवारी पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांची भेट घेऊन हल्लेखोरांनी सोन्याची चेन आणि अंगठी लंपास केल्याची तक्रार केली. त्यानंतर हल्लेखोरांवर दरोडा आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गेल्या आठवड्यात मोरेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर पत्नीला त्रास देत असल्यानेच आंबी यांना मारहाण केली. त्यात ते बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना शंभरफुटी रस्त्यावरील साईमंदिरजवळ सोडून देण्यात आले. त्यांच्या हाताच्या बोटातील अंगठी आणि गळ्यातील चेन काढून घेतल्याची कबुली दिली.