Wed, May 22, 2019 16:16होमपेज › Sangli › येळावी दरोडाप्रकरणी आठजण ताब्यात

येळावी दरोडाप्रकरणी आठजण ताब्यात

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 12:37AMतासगाव : शहर प्रतिनिधी

तालुक्यातील येळावी  येथे द्राक्ष व्यापार्‍याच्या कामगारांना मारहाण करुन त्याचा टेम्पो, दोन लाख रुपयांची रोकड व चार मोबाईल असा एकूण सहा लाख पाच हजार दोनशे रुपयांची लूट केल्याप्रकरणी वाळवा येथील आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
इस्माईल महमंद हनिफ शेख (रा. कुडची, ता. रायबाग, जि. बेळगाव) या व्यापार्‍याने वाळवा येथील बाग ठरवल्यानंतर नेली नाही. त्यामुळे एजंटने बदला घेण्याच्या उद्देशाने हा दरोडा टाकल्याचे समोर आले आहे.

राकेश शिवाजी पाटील (वय 30), संग्राम रावसाहेब पाटील (वय 26), निहाल इसाक लांडगे (वय 25), रविंद्र राजाराम तुपे (वय 31), शरद उर्फ गोट्या बबन लोहार (वय 27), संतोष उर्फ महेश बाबू बनसोडे (वय 29), योगेश चंद्रकांत चव्हाण (वय 24), अमोल गणपती सावंत (वय 24, सर्व रा. वाळवा, ता. वाळवा) अशी त्यांची नावे आहेत.  व्यापारी शेख यांचा दिवाणजी इस्माईल हुसेनबा मोमीन (वय 38, रा. कुडची, ता. रायबाग, जि. बेळगाव) यांनी फिर्याद दिली. 

अकरा दिवसांपूर्वी व्यापारी शेख यांनी वाळवा येथे एक द्राक्षबाग घेतली होती. त्यावेळी राकेश शिवाजी पाटील याने मध्यस्थी केली होती. मात्र शेख यांनी अर्धी बाग नेली.  यामुळे संबंधीत शेतकरी राकेश यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत होता. त्यामुळे राकेश वैतागला होता.  त्याने त्याच्या अन्य सात मित्रांना घेऊन हा कट रचला. कुडची येथून पहाटे पाच वाजता मोमीन कर्मचार्‍यांना घेऊन टेंपो (के.ए. 22 सी. 2986) यातून निघाले होते. ते आठ वाजता येळावी येथे पोहोचले. यावरुन राकेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपणच दरोडा टाकल्याचे कबूल केले. त्याच्याकडून चार लाख रुपये किंमतीचा टेंपो, दोन लाख रुपये रोख, पाच हजार दोनशे रुपयांचे चार मोबाईल असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.