तासगाव : प्रतिनिधी
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत सत्ताधारी मनमानी करीत आहेत. गरज नसताना तासगाव व सावळज शाखांच्या इमारती रंगविण्यात आल्या आहेत. हे रंगकाम करताना घोटाळा झाला आहे. त्यांनी खर्चाच्या रकमेत मोठा अपहार केला आहे, असा आरोप तासगाव तालुका शिक्षक संघाचे नेते श्रीकांत पवार यांनी येथील संघाच्या बैठकीत केला. शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस तथा बँकेचे संचालक अविनाश गुरव, रणजित नाटेकर, खाजासाहेब शेख, आण्णासाहेब गायकवाड, दीपक माळी, महादेव साखरे, आनंदा उतळे, मलकुद्दिन मुल्ला उपस्थित होते.
या बैठकीत श्रीकांत पवार यांच्यासह पदाधिकार्यांनी सत्ताधार्यांच्या कारभारावर जोरदार आरोप केले. पवार म्हणाले, बँकेचे विद्यमान सत्ताधारी संचालक शिक्षक सभासदांच्या हिताचे निर्णय राबवत नाहीत. निवडणूक काळातील व्याजदराची घोषणा हवेतच विरली आहे. पगारदारांच्या पतपेढीपैकी राज्यात सर्वाधिक व्याजदर बँक आकारते आहे. लाभांश व कायमठेवीवर मात्र निचांकी दराने व्याज दिले जात आहे. बँकेचे संचालक अविनाश गुरव म्हणाले, दहा वर्षाच्या सत्तेच्या काळात सत्ताधार्यांनी सभासदांचे हित पायदळी तुडवून केवळ स्वार्थ साधला आहे. जिल्ह्यातील सभासद यापुढील काळात त्यांना थारा देणार नाहीत.
याची कल्पना आल्याने परजिल्ह्यातील शिक्षकांना सभासद करण्याचा डाव सत्ताधारी मंडळी खेळत आहेत.आम्ही न्यायालयात दाद मागून त्यांचे हे मनसुबे उधळून लावू. नंदकुमार खराडे म्हणाले, 100 टक्के वसुली असूनही पठाणी दराने व्याज आकारले जात आहे. यामुळे अनेक शिक्षक सभासद मध्यवर्ती बँकेकडे वळले आहेत. या कारभाराविरोधात जिल्हा निबंधकांकडे तक्रार करणार आहे.
शब्बीर तांबोळी म्हणाले, छुपी नोकर भरती करून त्यांच्या पगारावर सभासदांच्या पैशाची उधळपट्टी करण्याचा एककलमी कार्यक्रम सत्ताधार्यांनी राबविला आहे. बँकेच्या मनमानी कारभाराला विरोध म्हणून लवकरच बँकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
द्वेष आणि आकसापोटी आरोप बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पवार म्हणाले,इतर बँकांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अत्याधुनिक सोयी सुविधा देणे गरजेचे आहे. वीस वर्षापूर्वी सावळज आणि तासगाव शाखा इमारतींचे रंगकाम केले होते. आताचे काम निविदा प्रक्रिया राबवून आणि नियमांच्या चौकटीत राहून केले आहे. सभासदांनी नाकारलेली मंडळी केवळ व्यक्तिगत द्वेष आणि आकसापोटी आरोप करीत आहेत.