Thu, Jun 27, 2019 09:44होमपेज › Sangli › शिष्यवृत्तीत तासगाव तालुका अव्वल

शिष्यवृत्तीत तासगाव तालुका अव्वल

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 10:05PMतासगांव : प्रतिनिधी

प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, पंचायत समिती शिक्षण विभाग आणि पदाधिकार्‍यांच्या अथक प्रयत्नाने तासगाव तालुक्याने शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी मारली आहे. कोल्हापूर विभागात तालुका प्रथम आला आहे. पाचवी व आठवीचे मिळून तब्बल 211 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. याशिवाय नवोदय विद्यालय आणि एन.एम.एम.एस. परीक्षेत तासगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे . 

राज्य परीक्षा परिषदेने पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर केला. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील 436 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. 122 विद्यार्थी तासगाव तालुक्यातील आहेत. तीन विद्यार्थी राज्यपातळीवरील, 91 ग्रामीण व 28 विद्यार्थी शहरी पातळीवरील शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत चमकले. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातील 89 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. तीन विद्यार्थी राज्य पातळीवरील, 46 ग्रामीण तर 30 विद्यार्थी शहरी भागासाठी असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत चमकले.  जिल्ह्यातून या परीक्षेत यश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांपैकी 25 टक्के एकट्या तासगाव तालुक्यातील आहेत.

एन. एम. एम. एस. परीक्षेत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील 33 आणि माध्यमिक शाळेतील 35 असे 68 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. सहायक शिक्षिका वैशाली पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील 14 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. नवोदय विद्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 80 पैकी 13 विद्यार्थी तासगाव तालुक्यातील आहेत.

सहायक शिक्षक प्रकाश सुतार यांच्या विशेष प्रयत्नामुळे सावळज जिल्हा परिषद शाळेतील 10 विद्यार्थी पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आले. शिरगाव जिल्हा परिषद शाळेतील जयश्री मोहिते यांचे आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. सुनीता आकाराम पाटील आणि वैशाली राजेश पाटील या शिक्षिकांनी अविरतपणे मेहनत करुन जिल्हा परिषदेच्या बोरगाव शाळेतील पाचवीचे पाच व आठवीचे 10 असे तब्बल 15 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणले.

एकीच्या बळाचे फळ : प्रदीप कुडाळकर

तालुक्याला मिळालेल्या यशाबद्दल  गटशिक्षण अधिकारी प्रदीप कुडाळकर म्हणाले, पंचायत समिती सभापती बेबीताई माळी, उपसभापती संभाजी पाटील, शिक्षण सभापती तम्मनगौडा रविपाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे,  गटविकास अधिकारी अरुण जाधव, विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे, शामल माळी, छाया अनुगडे, गट समन्वयक आकाराम पाटील व शिक्षक वर्ग या सर्वांच्या सहकार्यरुपी मार्गदर्शनातून हे यश मिळाले आहे. हे आमच्या एकीच्या बळाचे फळ आहे. यावर्षी कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. पुढील वर्षी राज्यात क्रमांक मिळवणे हे आमचे ध्येय आहे.