होमपेज › Sangli › छावणी चालकांचे धाबे दणाणले

छावणी चालकांचे धाबे दणाणले

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 8:17PMतासगाव: दिलीप जाधव

तासगाव तालुक्यातील चारा घोटाळा तब्बल तीन वर्षांनी चव्हाट्यावर आल्याने छावणी चालकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाची सखोल व पारदर्शी चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. 

छावण्यांचा ठेका कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध मजूर सोसायट्या, विकास सोसायट्यांनी घेतला होता. या छावण्या चालवताना विविध नियम व अटी शासनाने घालून दिल्या होत्या. मात्र तालुक्यातील अनेक  छावण्यांत पारदर्शी कारभार चालला नाही, अशा तक्रारी होत्या. शासनाच्या पथकांकडून या छावण्यांची वेळोवेळी तपासणी करण्यात आली. तपासणीवेळी या छावण्यांमध्ये मोठे गौडबंगाल आढळून आले. मात्र त्यावेळी कोणताही ठेकेदार अथवा संस्थेवर कारवाई झाली नाही. त्यामुळे चारा छावणीतील हा घोटाळा दडपल्याची चर्चा सुरू झाली. 

दरम्यान, छावणीत ज्यांनी - ज्यांनी घोटाळे करुन डल्ला मारला त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. त्या याचिकेवर गेल्या काही वर्षांपासून सुनावणी सुरू आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी विजय काळम - पाटील यांनी तपासणीदरम्यान ज्या - ज्या छावण्यांमधील रेकॉर्डमध्ये तफावत आढळून आली, ज्या छावण्यांमध्ये घोटाळा झाला आहे, अशा ठिकाणी  संबंधित छावणी चालक अथवा सहकारी संस्थांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले होते. त्यांच्या आदेशानुसार गुरुवारी तालुक्यातील 30 छावणीचालकांवर गुन्हे दाखल झाले. 

या गुन्ह्यांमुळे छावणीत चालकांनी केलेली भानगड उजेडात आली आहे. दरम्यान, या गुन्ह्यांमुळे छावणी चालकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यांच्या पाठीमागे आता चौकशीचा ससेमीरा लागणार आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. काहीजणांनी तर सन 2012 ते 2014 चे छावण्यांचे रेकॉर्ड, कागदपत्रे जमा करण्यासाठी धडपड सुरू केली आहे.