होमपेज › Sangli › तासगाव तालुक्यात प्रादेशिक योजना व्हेंटिलेटरवर

तासगाव तालुक्यात प्रादेशिक योजना व्हेंटिलेटरवर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

तासगाव : दिलीप जाधव 

तासगाव तालुक्यातील चार प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना आठ महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर आहेत. लाभक्षेत्रातील गावातून जमा होणारी पाणीपट्टी आणि वीजबिल, कामगार पगार, देखभाल व दुरुस्ती यावर होणारा खर्च यामधील अंतरामुळे महावितरणच्या थकबाकीचा आकडा लांबत 22 कोटीवर गेला आहे. यामुळे तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 39 गावामध्ये आठ महिन्यापासून पाणीबाणी निर्माण झाली आहे.

मणेराजुरी प्रादेशिक,  कवठेमहांकाळ - विसापूर प्रादेशिक, येळावी प्रादेशिक  आणि पेड प्रादेशिक अशा 4 योजनांद्वारे तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 39 गावांना गेल्या पंधरा वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा  केला जातो. मणेराजुरी प्रादेशिक योजनेत 13,  कवठेमहांकाळ-विसापूर प्रादेशिक योजनेत 15, येळावी प्रादेशिक योजनेत 6 आणि पेड प्रादेशिक योजनेत 5 गावांचा समावेश आहे. योजनेत समाविष्ट असलेल्या 39 गावाकडून जमा होणारी वार्षिक पाणीपट्टीची रक्कम 1 कोटी 28 लाख 54 हजार 596 रुपये आहे. तर योजना चालविण्यासाठी येणारे वीजबिल, कामगार पगार व देखभाल दुरुस्ती यावर होणारा खर्च सुमारे 5 कोटी 24 लाख 2 हजार रुपये एवढा आहे.

यामुळे योजना चालू ठेवण्यासाठी दरवर्षी जवळपास 3 कोटी 95 लाख 47 हजार 404  रुपये एवढी अतिरिक्त तरतूद करावी लागते. पाणीपट्टी 100 टक्के वसूल नाही झाली तर हा आकडा आणखीनच वाढतो. उत्पन्न आणि खर्च यामधील तफावतीमुळे महावितरणचे वीजबिल वेळेवर भरता येत नाही. त्यामुळे थकबाकीची रक्कम प्रत्येक वर्षी वाढत जाऊन 22 कोटी 8 लाख 29 हजार 60 रुपयांवर गेली आहे. या थकबाकीसाठी 10 मार्च 2017 रोजी महावितरणने पाचव्या मैलावरील जलशुद्धीकरण केंद्र आणि भिलवडी स्टेशन येथील जॅकवेलचा विद्युतपुरवठा खंडित केला. तेव्हापासून चारही योजना बंदच आहेत.