Fri, Jul 19, 2019 17:43होमपेज › Sangli › महसूल कर्मचार्‍यांसाठी शासनाकडून व्यायामशाळा

महसूल कर्मचार्‍यांसाठी शासनाकडून व्यायामशाळा

Published On: Dec 03 2017 1:25AM | Last Updated: Dec 02 2017 8:40PM

बुकमार्क करा

तासगाव : शहर प्रतिनिधी

महसूल कर्मचार्‍यांसाठी तहसीलदार सुधाकर भोसले यांनी प्रयत्न करुन येथे व्यायामशाळा उभारली, ही कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम - पाटील यांनी केले. राज्यात प्रथमच महसूल कर्मचार्‍यांसाठी शासनाकडून व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. तिच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी पाटील बोलत होते. वॉटर एटीएम तसेच मनी एटीएमचेही उद्घाटन करण्यात आले. हा प्रयोगही राज्यात प्रथम तासगावमध्येच होत असल्याचे सांगण्यात आले. 

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, पोलिस उपअधीक्षक अशोक बनकर, तहसीलदार सुधाकर भोसले, तालुका कृषी अधिकारी आर. बी. शिंदे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, कोणतीही गोष्ट मनात असेल तरच ती प्रत्यक्षात उतरत असते. तहसील कार्यालयात व्यायामशाळा बांधण्याचे तासगावच्या तहसीलदारांनी ठरवले. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून तीन लाख रुपये मंजूर करुन ही अद्ययावत व्यायामशाळा उभारली. लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्‍न सोडवण्याचे काम तहसील कार्यालयातून झाले पाहिजे. इथून बदली होऊन जाण्यापूर्वी हा जिल्हा बदललेला मला पहायचा आहे, माझ्याकडे अशा कामांची यादी करुन ठेवली आहे. त्यादृष्टीने मी काम करणार आहे.

डॉ. खरात म्हणाले, लोकांमध्ये मिसळून आपण काम केले पाहिजे. आपल्याविषयी लोकांमध्ये आदर तयार झाला पाहिजे, अशी भूमिका महसूल विभागाची आहे. तहसीलदार भोसले म्हणाले, लोकांना हे कार्यालय आपले वाटावे, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी प्रयत्न असतो. यातूनच हे एटीएम सुरू केले. कर्मचार्‍यांच्या स्वास्थाविषयी आपण काहीतरी करावे, या भावनेतूनच ही व्यायामशाळा उभारली.