Sat, Jul 20, 2019 23:21होमपेज › Sangli › कमी वीज दराबरोबर बोगस कनेक्शन तोडण्याची गरज

कमी वीज दराबरोबर बोगस कनेक्शन तोडण्याची गरज

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 08 2017 9:44PM

बुकमार्क करा

तासगाव : दिलीप जाधव 

जमा होणारी पाणीपट्टी आणि योजना चालविण्यासाठी येणारा खर्च यातील मोठ्या तफावतीमुळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांवरील संकटाचे ढग दिवसेंदिवस गडद होत आहेत. शासन आणि जनतेने मनावर घेतले तर पुन्हा एकदा योजना सुरू होऊन सक्षमपणे चालू शकतात. यासाठी वीज बिलाची आकारणी कृषी पंपांच्या दराने होणे आवश्यक आहेच, पण लाभ घेणार्‍या 39 गावांतील किमान 80 टक्के

तरी कुटुंबांनी कनेक्शन घेणे गरजेचे आहे. योजना चालविण्यासाठी येणारा वार्षिक खर्च 5 कोटी 24 लाख 2 हजार रुपये आहे. यातील 3 कोटी 13 लाख 4 हजार रुपये वीज बिल भरावे लागते. जर योजनांना कृषी पंपांच्या दराने वीज मिळाली तर 90 लाख 52 हजार 591 रुपयांत वीज मिळून 2 कोटी 10 लाख 98 हजार रुपयांची बचत होईल.तसे झाल्यास 3 कोटी 1 लाख 50 हजार 591 रुपये खर्चात योजना चालू  शकतात. 

योजनांचा लाभ घेणार्‍या 39 गावांतील 21 हजार 755 पैकी फक्त 8 हजार 399 कुटुंबांकडे अधिकृत कनेक्शन आहेत. किमान 80 टक्के कुटुंबांनी कनेक्शन घेतले तर 17 हजार 404 कुटुंबांकडून 3 कोटी 13 लाख 27 हजार 200 रुपये पाणीपट्टी मिळू शकते. कृषी पंपांच्या दराने वीज मिळाल्यास जमा होणारी पाणीपट्टी आणि योजना चालविण्यासाठी येणारा खर्च याचा मेळ बसून सर्व योजना क्षमपणे  चालतील.