Mon, Jun 24, 2019 16:35होमपेज › Sangli › तीन मुलींसह मातेची आत्महत्या

तीन मुलींसह मातेची आत्महत्या

Published On: Apr 10 2018 1:13AM | Last Updated: Apr 10 2018 1:21AMतासगाव : शहर प्रतिनिधी

वज्रचौंडे (ता. तासगाव) येथे स्टोन क्रशरवर काम करणार्‍या महिलेने पतीसोबत झालेल्या किरकोळ वादातून तीन मुलींसह विहिरात उडी घेऊन आत्महत्या केली.  सुनीता सुभाष राठोड (वय 32), आशा आणि उषा (वय 4) आणि ऐश्‍वर्या (वय 2, सर्व मूळ रा. लमाणतांडा - 2, विजापूर, कर्नाटक) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत तासगाव पोलिसांत नोंद झाली आहे. हा प्रकार रविवारी रात्री उशिरा उघडकीस आला. सोमवारी मृतदेह बाहेर काढण्यात आले. 

याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी  वज्रचौंडे येथील क्रशरवर विजापूर येथील लमाण समाजातील पंधरा ते वीस कुटुंबे दोन वर्षांपासून मजुरी करत आहेत. सुनीता हिचे कुटुंब गेल्या तीन महिन्यांपासून या ठिकाणी कामाला आहे. सुनीताचा पती सुभाष लालसिंह राठोड (वय 40) याचा स्वत:चा ट्रॅक्टर आहे. शनिवारी सावळज येथील आठवडा बाजारमध्ये सुभाषचे पाकीट चोरीला गेले. या पाकिटात अठराशे रुपये आणि काही कागदपत्रे होती. पाकीट चोरीला गेल्यावरून शनिवारी रात्री सुनीता आणि सुभाष यांच्यात किरकोळ वाद झाला होता. पुन्हा रविवारी सकाळी वाद  झाला. दोघांच्या वादामुळे घरात तणावाचे वातावरण होते.

दुसर्‍या दिवशी  सुभाष दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मेहुण्यासोबत ट्रॅक्टरची दुरुस्ती करण्यासाठी सावळजला गेला. सुभाष बाहेर गेल्याचे पाहून रागाच्या भरात सुनीता तीन मुलींसह  घराबाहेर पडली. यावेळी वस्तीवरील अन्य मजूर खाणीच्या कामावर होते. त्यामुळे कोणालाच सुनीता घरातून बाहेर गेल्याचे माहीत झाले नाही. सुभाष घरी आल्यानंतर सुनीता मुलींसह घरात नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सुभाषने सगळीकडे चौकशी सुरू केली; मात्र शोध लागला नाही. दरम्यान हे सर्व मजूर ज्या भागात राहतात तिथूनच काही अंतरावर संभाजी  वसंत जाधव यांची विहीर आहे.

या विहिरीतील मोटार बंद करण्यासाठी जाधव रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आले होते. त्यावेळी त्यांना विहिरीच्या पाण्यात चपला तरंगत असल्याच्या दिसून आल्या. त्यांना याबाबत शंका आली. वस्तीवरील मजुरांना याबाबत विचारणा केली. यावेळी सुनीता व त्यांच्या तीन मुली गायब असल्याच्या समोर आले. या विहिरीत सुनीताने मुलींसह आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा संशय  बळावला. त्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली.  त्यावेळी आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.   या घटनेची माहिती नातेवाईक व  वज्रचौंडेतील नागरिकांनी पोलिसांना दिली.

परिसरातील नागरिकांनी व पोलिसांनी रात्री  नऊ वाजण्याच्या सुमारास  दोर आणि काटेरी झुडपांच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जुळ्या मुलींचे मृतदेह  काटेरी झुडुपांना अडकून  वर आले. मात्र अंधार असल्याने ते वर काढता आले नाहीत. सोमवारी सकाळी पोलिस निरीक्षक उमेश दंडिले, पोलिस उपनिरीक्षक प्रियांका सराटे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळावर आले.  सांगलीतील आयुष फाऊंडेशन या बचाव  पथकाच्या मदतीने विहिरीतून चौघींचे मृतदेह  बाहेर काढण्यात आले. दुपारी दोन वाजेपर्यंत बचाव पथकाचे काम सुरु होते.

जुळ्या बहिणी एकमेकींना बिलगलेल्या अवस्थेत

सुनीता आणि सुभाषचे सात वर्षांपूर्वी लग्‍न झाले होते. त्यांना आशा आणि उषा या चार वर्षांच्या जुळ्या मुली होत्या. सुनीताने आत्महत्या करण्यापूर्वी तीनही मुलींना विहिरीत टाकून शेवटी स्वत: उडी घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला. सकाळी उषा आणि आशाचा मृतदेह एकमेकांना मिठी मारलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे जन्माला आल्याही एकत्र आणि गेल्याही एकत्र, अशीच भावना बघ्यांतून व्यक्‍त होत होती.

दोन दिवसांपूर्वीच विहिरीत पाणी सोडले

गव्हाण येथील बंधार्‍यामध्ये दोनच दिवसांपूर्वी पाणी आले. हे पाणी उचलून  मालकाने त्याच्या विहिरीत सोडले होते. तत्पूर्वी विहीर कोरडीच होती. परिसरात जवळ दुसरी कोणतीच विहीर नाही. पाणी असल्याचे पाहून सुनीताने हे धाडस केले असावे, पाणी नसते तर तिने आत्महत्या केलीच नसती, असेही वस्तीवरील लोक बोलत होते.
 

 

 

tags : tasgaon,news, Mother's, suicide,three, girls, in tasgaon