Sun, Mar 24, 2019 04:47



होमपेज › Sangli › तासगाव बाजार समितीचे सचिव अखेर निलंबित

तासगाव बाजार समितीचे सचिव अखेर निलंबित

Published On: Mar 09 2018 1:36AM | Last Updated: Mar 08 2018 11:30PM



तासगाव : शहर प्रतिनिधी

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रकांत सूर्यवंशी यांना सचिवपदावरुन गुरूवारी अखेर निलंबित करण्यात आले. बाजार समितीचे सभापती रविंद्र पाटील यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

सूर्यवंशी यांना म्हणणे मांडण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर कायमस्वरुपी निर्णय घेण्यात येणार आहे. पुणदी (ता. तासगाव) येथील बेदाणा व्यापारी मानसिंग जयसिंग पाटील यांनी दि.12 जानेवारीला कर्जास कंटाळून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये सूर्यवंशी यांच्याकडून सावकारीतून घेतलेल्या पैशाच्या तगाद्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले होते. 

त्यानुसार सचिव सूर्यवंशी यांच्यावर तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती.  त्यामुळे आज बाजार समितीमध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये एकूण 16 पैकी 15 संचालकांनी या कारवाईला  सहमती दर्शवली. कुमार शेटे यांनी एवढ्या लवकर कायदेशीर कारवाई करणे योग्य नसल्याचे कारण सांगून ठरावास विरोध केला. यावेळी बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर करण्यात आला. 

सभापती रविंद्र पाटील, उपसभापती संपतराव सूर्यवंशी, संचालक अविनाश पाटील, सतीश झांबरे, राजेंद्र पाखरे, अजित जाधव, अ‍ॅड. जयसिंग जमदाडे, विठ्ठल काशीद, लक्ष्मण पाटील, धनाजी पाटील, कुमार शेटे, पितांबर पाटील, नवनाथ मस्के, विवेक शेंडगे उपस्थित होते.