Fri, Apr 26, 2019 19:55होमपेज › Sangli › दिघंचीत  तलाठी, कोतवालांना मारहाण

दिघंचीत  तलाठी, कोतवालांना मारहाण

Published On: Jul 22 2018 12:59AM | Last Updated: Jul 21 2018 11:37PMआटपाडी : प्रतिनिधी  

दिघंची  येथे अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पथकातील तलाठी व कोतवालांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच मारहाणही करण्यात आली. या घटनेनंतर वाळू तस्करांनी त्यांचे वाहन घेऊन पलायन केले. याप्रकरणी तलाठी उत्तम  जानकर (वय 48) यांनी  फिर्याद दिली आहे. त्यानुसार  नितीन रामचंद्र जाधव ( रा.देवापूर, ता. माण, जि.सातारा), चालक अजय जाधव व त्यांच्या एका साथीदारांवर आटपाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

दिघंचीचे मंडल अधिकारी पांडुरंग  कोळी, तलाठी उत्तम जानकर आणि कोतवाल शिवाजी पुसावळे दिघंची येथे सकाळी  अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेले होते.तहसीलदारांच्या सूचनेनुसार पांढरेवाडी येथे हे पथक गेले. पांढरेवाडीच्या तालमीपासून रानमळा रस्त्यावर त्यांना वाळूने भरलेली विना नंबरची महिंद्रा पीकअप दिसली.

पथकाने विचारणा केली असता चालकाने त्याचे नांव अजय जाधव असल्याचे आणि मालकाचे नांव नितीन जाधव असल्याचे सांगितले.पथकाने वाहन तहसील कार्यालयास नेण्यास बजावले. तलाठी जानकर वाहनात बसले आणि कोतवाल पुसावळे मोटारसायकलवरुन वाहनामागून निघाले.

यावेळी वाहन मालक नितीन जाधव एका साथीदारासह मोटारसायकलवरुन आले. त्याने कोतवालाची मोटारसायकल लाथ मारुन पाडली आणि गाडीची किल्ली काढून घेतली. त्यानंतर वाहनमालकाने तलाठी जानकर यांना वाहनातून खाली खेचून साथीदारासह   

तलाठी जानकर यांना शिवीगाळ केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या दरम्यान चालकाने सोलापूर जिल्ह्यातील पिलीवच्या दिशेने वाहनासह पोबारा केला. याबाबत तलाठी जानकर यांनी वाहन मालक, चालक आणि त्यांच्या एका साथीदारावर  शासकीय कामात अडथळा आणून जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाण करुन वाळूने भरलेली बोलेरो पीक अप गाडी जबरदस्तीने पळवून नेल्याची फिर्याद दिली आहे.