होमपेज › Sangli › पावसाळ्यात शॉक लागण्यापासून घ्या काळजी

पावसाळ्यात शॉक लागण्यापासून घ्या काळजी

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 10 2018 1:49AMसांगली : प्रतिनिधी 

पावसाळ्यात वीज खंडित होण्याचे व शॉक लागण्याचे प्रकार सतत घडतात. यामुळे लोक महावितरणचे वाभाडे काढतात. परंतु, वीज का गेली, का जाते, शॉक का व कसा लागतो, या प्रश्‍नांची उत्तरे कोणीही शोधत नाही. त्यामुळे यंत्रणेला दोष देण्यापेक्षा त्याच्यातील गुंतागुंत समजून घेऊन अपघात टाळणे शक्य आहे. 

खांबात वीज उतरू नये यासाठी चिनीमातीचे इन्सुलेटर बसविले जातात. हे इन्सुलेटर उन्हामुळे किंवा वीजप्रवाहामुळे गरम होतात. पावसाचे थेंब पडले की, त्याला तडे जातात. ज्यामुळे  वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो. यामुळे आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होऊन फिडर (वीज वाहिनी) बंद पडतो. जर फिडर बंद पडला नाहीतर जीवित अथवा वित्त हानी होते.

जेव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, त्यावेळी कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही याची खात्री करतात. वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फिडर चालू केला जातो. जर फिडर पुन्हा बंद पडला तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित केले जाते. बिघाड शोधणे तेवढे सोपे नसते. ऊन-वार्‍याची, पावसाची किंवा अंधाराची पर्वा न करता ही शोध मोहीम हाती घेतली जाते. वेळप्रसंगी बंद पडलेल्या वाहिनीचे सर्व खांब चढून तपासावे लागतात. त्यानंतर दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत केला जातो. 

वीज गेल्यास काय करावे, काय करू नये

आपल्या घरात ELCB Switch असणे गरजेचे आहे, जेणेकरून घरातील यंत्रणेत बिघाड झाला तर वीजपुरवठा बंद होऊन जीवितहानी टाळता येईल.
अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार तपासणी करावी.
उपकरणे किंवा वायरिंग ओलावा व पत्र्यापासून सुरक्षित असावी.
उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी.
वीज खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत.
वीज खांबाच्या खाली गोठे किंवा कडब्याची गंजी उभारू नये.
वीज खंडित झाल्यास 15-20 मिनिटांनी कंपनीला संपर्क करावा.
बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास कंपनीला संपर्क करावा. जेणेकरुन तातडीने दुरूस्ती करुन वीजपुरवठा सुरळीत होईल.
तारा तुटल्यास त्याला हात लावू नये. 
शेतकर्‍यांनी शेतीपंप, स्टार्टर, मीटरबाबत विशेष दक्षता घ्यावी.

वीज खंडित झाल्यास 5 ते 10 दहा मिनिटे थांबून महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा. हे क्रमांक बिलावर असतात. मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे या क्रमांकावर 24 तास सेवा दिली जाते. आलेल्या तक्रारी संगणकीय प्रणालीमार्फत संबंधित जनमित्र व अभियंत्यापर्यंत पोहोचवून त्याचे तातडीने निराकरण केले जाते. महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपमधूनही विजेसंबंधीच्या तक्रारी नोंदविता येतात.    -विकास पुरी, जनसंपर्क अधिकारी, महावितरण