Wed, Jun 26, 2019 11:51होमपेज › Sangli › दुकानगाळ्यांच्या भाडेवसुलीसाठी कारवाईचा बडगा

दुकानगाळ्यांच्या भाडेवसुलीसाठी कारवाईचा बडगा

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 22 2018 10:48PMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यात व्यापारी संकुलांमधील प्रलंबित दुकान गाळ्यांच्या भाडेवसुलीसाठी कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभेत देण्यात आले. जिल्हा परिषदेने बांधलेल्या व्यापारी संकुलांना जिल्हा परिषदेचे नाव देण्याच्या सुचना अधिकार्‍यांना दिल्या. जीर्ण झालेल्या धोकादायक शाळा खोल्या, इमारतींकडे सदस्यांनी लक्ष वेधले. जिल्हा परिषदेत शुक्रवारी बांधकाम समिती सभा झाली.अध्यक्षस्थानी सभापती अरूण राजमाने होते. सदस्य अरूण बालटे, सरदार पाटील, संजीव पाटील, जगन्नाथ माळी, जयश्री पाटील, आशा पाटील, प्रभारी कार्यकारी अभियंता जे. वाय. काळे, पंचायत समितींचे उपअभियंते उपस्थित होते. 

जिल्हा परिषद मालकीच्या व्यापारी संकुलातील प्रलंबित भाडेवसुलीसाठी कारवाईचा बडगा उगारावा अशा सुचना दिल्या. जिल्हा परिषद मालकीच्या मालमत्ता व दुकानगाळ्यांना जिल्हा परिषदेच्या नावाचा, मालमत्तेचा क्रमांक व तपशील दर्शविणारे फलक लावण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. 

दलित वस्तीसाठी 30 कोटी

दलित वस्ती सुधार योजनेसाठी 30 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. जास्तीत जास्त प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आलेे. कणेगाव (ता. वाळवा) येथील स्वागत कमानी संदर्भात शासन निर्णयापूर्वी ठराव झालेला आहे. त्यामुळे या स्वागत कमानीस जिल्हा परिषदेची मान्यता असल्याचा ठराव करण्यात आला. 

607 शाळा खोल्यांचे बांधकाम

जीर्ण झालेल्या शाळा खोल्या, इमारती पावसामुळे धोकादायक बनल्या आहेत. नवीन बांधकाम, दुरुस्तीची मागणी करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात 607 शाळा खोल्यांचे बांधकाम आणि 519 शाळा खोल्यांची दुरुस्ती होणार असल्याचे सांगण्यात आले.