Wed, Jul 24, 2019 12:08होमपेज › Sangli › ‘भीमा-कोरेगाव’ सूत्रधारांवर कारवाई करा

‘भीमा-कोरेगाव’ सूत्रधारांवर कारवाई करा

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 9:09PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

भीमा - कोरेगाव दंगलीची न्यायालयीन तसेच सीबीआय चौकशी करा. दोषींसह सूत्रधारांवर कडक कारवाई करा, आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक मोर्चा काढण्यात आला. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील  यांच्या  पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चात शहरासह जिल्हाभरातील हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांना मागण्याचे निवेदन दिले. जिल्हाधिकार्‍यांनी मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याची ग्वाही दिली.  दरम्यान, मोर्चात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भीमा- कोरेगावमधील घटनांचे सांगलीतही जोरदार पडसाद उमटले. त्या पार्श्‍वभूमीवरती सद्भावना रॅली म्हणून आज आरपीआयतर्फे या मोर्चाचे आयोजन केले होते. 

मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सकाळपासून विजयनगर ते गेस्ट हाऊस या मार्गावरील सर्व वाहतूक इतरत्र वळवली होती. सकाळी दहाच्या सुमारास विश्रामबाग चौकात कार्यकर्ते एकत्र येण्यास सुरुवात झाली. निळे झेंडे घेतलेले कार्यकर्ते घोषणा देत या ठिकाणी येत होते. दुपारी एकच्या सुमारास मिरज येथील कार्यकर्ते घोषणा देत त्या ठिकाणी आले. माजी महापौर विवेक कांबळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे आदीच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून दुपारी दोनच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा अडीचच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. 

विवेक कांबळे म्हणाले, राज्य घटनेला, शांततेला आव्हान देण्याचा मनुवादी विचार पुढे येत आहे. आम्ही तो रोखल्याशिवाय राहणार नाही. दोषींवर कारवाई होईपर्यंत आमचा आंदोलनचा लढा सुरूच राहील. नगरसवेक ठोकळे म्हणाले,  राज्यघटनेला चॅलेंज देण्याचा प्रयत्न सांगलीत होत आहे. तो आम्ही चालू देणार नाही. नानासाहेब वाघमारे, जतचे माजी सरपंच सजंय कांबळे,  अपर्णा वाघमारे, बोधीसत्व माने आदींचे भाषण झाले. अशोक कांबळे, बापूसाहेब सोनवणे, सुनील साबळे, अरविंद कांबळे, आशिष गाडे, संजय कांबळे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.