Mon, Aug 19, 2019 01:38होमपेज › Sangli › हिंदुत्वनिष्ठांची बदनामी करणार्‍यांवर कारवाई करा

हिंदुत्वनिष्ठांची बदनामी करणार्‍यांवर कारवाई करा

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 25 2018 11:12PMसांगली : प्रतिनिधी

अलिकडील काही वर्षांत कोणत्याही पुरोगामी विचारवंतांची हत्या झाली, की  त्यामध्ये सनातन संस्थेचा हात असल्याची सातत्याने आवई उठविली जाते. त्यामुळे तपास यंत्रणांचा तपास भरकटतो आहे. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांची बदनामी करणार्‍यांवर कठोर कारवाई कऱावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समन्वय समितीचे समन्वयक मनोज खाड्ये आणि  अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, सनातनविरोधी प्रचारात हिंदुत्वविरोधी संघटना  सहभागी आहेत. कॉ. गोविंदराव पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे नातेवाईक सनातन संस्थेवर सतत आरोप करीत असल्याने तपास यंत्रणांचा तपासही भरकटला आहे. 

हिंदुत्वनिष्ठांवर खोटे आरोप होत आहेत. याप्रकरणी हिंदुद्रोह्यांकडून कटकारस्थान रचले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाशी काहीही संबंध नसलेल्यांचाही बळी दिला जात आहे. याचप्रकारे अंनिसचे  डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना तासगाव येथील सूरज पोळ,  सचिन कुलकर्णी या दोन साधकांची नावे अकारण सोशल मीडियावरून पसरविली आहेत.  सनातन संस्थेबाबत अफवा पसरवून नाहक बदनामी करणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई करायला हवी. सनातनचे साधक सूरज पोळ यांची कोणतीही चौकशी झालेली नाही. संस्था कोणाच्याही हत्यांचे समर्थन करीत नाही.  तपास यंत्रणांनी खरे खुनी पकडावेत. यासाठी सनातन संस्थेकडून तपास यंत्रणांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असेही अ‍ॅड. पटवर्धन यांनी यावेळी सांगितले.  यावेळी शिवसेना कामगार सेनेचे  उपाध्यक्ष सचिन चव्हाण, सूरज पोळ, सचिन कुलकर्णी, विठ्ठल कुलकर्णी उपस्थित होते. 

एटीएसकडून चौकशी झाली : सचिन कुलकर्णी

एटीएसचे कदम नामक अधिकारी तसेच सांगलीतील एक पोलिस यांनी शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास माझ्याकडे चौकशी केली. प्रसारमाध्यमांत नावे आल्याने चौकशी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सनातन संस्थेसाठी किती वर्षांपासून काम करता, सुधन्वा गोंधळेकर याला ओळखता का, सनातन संस्थेचे काय काम करता अशा स्वरूपाचे प्रश्‍न विचारून लेखी जबाबही घेतला. त्याची एक प्रतही त्यांनी दिली आहे. यापूर्वी माझी कधीही पोलिस, एटीएस किंवा अन्य कोणत्या तपास यंत्रणांकडून कसलीही चौकशी झाली नसल्याचे सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.