Wed, Mar 20, 2019 22:57होमपेज › Sangli › ‘ईव्हीएम’ची आज सर्वांसमक्ष टेस्ट घ्या

‘ईव्हीएम’ची आज सर्वांसमक्ष टेस्ट घ्या

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 10:30PMसांगली : प्रतिनिधी

महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. निवडणूक प्रशासन आणि पोलिस बळाचा वापर करून आघाडीचे उमेदवार, कार्यकर्ते, नागरिकांना त्रास दिला जात आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘ईव्हीएम’मशीन्सची टेस्ट घ्यावी, अशी मागणी निवडणूक प्रशासनाकडे केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, प्रकाश शेंडगे, सुरेश पाटील, इलियास नायकवडी, श्रीनिवास पाटील, कमलाकर पाटील, राहुल पवार, छायाताई पाटील, विनया पाठक उपस्थित होते.

शेवटचा उपाय ईव्हीएम असू शकतो

जयंत पाटील म्हणाले,  महापालिका निवडणुकीचे मतदान ‘ईव्हीएम’वर होणार आहे.  मात्र ‘ईव्हीएम’बाबत लोकांच्या मनात शंका आहे. त्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी या सर्व ‘ईव्हीएम’ची सर्वपक्षीय प्रतिनिधींसमोर टेस्ट घ्यावी. केवळ 5 ते 10 मते घेऊन ही तपासणी न करता 500 ते 600 मते टाकून टाकलेली मते योग्यप्रकारे पडतात का याची तपासणी करावी. सांगली महापालिकेत भाजपचा पराभव अटळ आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शेवटचा उपाय ईव्हीएम असू शकतो. 

पाटील म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा प्रथमपासून हस्तक्षेप जाणवतो आहे. राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराच्या पतीला हद्दपारीचा आदेश काढला होता. मात्र कोर्टाने प्रशासनावर ताशेरे ओढले आणि हद्दपारी रद्द केली. राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराच्या घरात रात्री एक महिला अधिकारी दोन-तीन पोलिस, कॅमेरामनला घेऊन घुसले. घरातील महिलांना धक्काबुक्की करून स्वयंपाक खोलीपर्यंत जाऊन व्हिडीओ शुटींग केले. पोलिस, प्रशासनाला अशाप्रकारे घरात घुसण्याचा अधिकार आहे का? मिरजेत एका समाजाची बैठक झाली. लगेच पोलिस  त्या समाजाच्या धर्मगुरुंच्या मागे लागले. कार्यकर्त्यांनाही त्रास दिला जात आहे. 

घरे दाखवितो, झडती घेणार का? 

पाटील म्हणाले, आघाडीच्या उमेदवारांच्या घरात झडती घेऊ नका. आम्ही घरे दाखवतो त्या घरांची झडती घेणार का? निवडणूक प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी कोणाच्या हातचे बाहुले बनून काम करू नये. सर्वांना समान न्याय द्यावा. आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे.  मतदानापूर्वी शेवटच्या दोन दिवसात भाजपच्या बॅगा हलक्या होतील. पण सामान्य लोक या बॅगांकडे बघत नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडून देण्याची मानसिकता मतदारांची आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 78 पैकी 60 हून अधिक जागा मिळतील, असेही त्यांनी सांगितले.