Wed, Jul 24, 2019 14:23होमपेज › Sangli › ‘ताकारी’साठी स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग मंजूर

‘ताकारी’साठी स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग मंजूर

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 14 2018 11:57PM

बुकमार्क करा
देवराष्ट्रे : वार्ताहर
जिल्ह्यातील ताकारी-म्हैसाळ सिंचन व्यवस्थापन विभाग स्वतंत्र करून ताकारी योजनेसाठी लाभक्षेत्रामध्येच सिंचन व्यवस्थापन विभाग सुरू करण्यासाठी महामंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. ताकारी योजनेच्या मुख्य कार्यालयाकडेच बांधकाम विभागासह सिंचन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्य कार्यालयाच्या प्रशासनाने प्रत्यक्ष कामालाही सुरवात केलेली आहे. यामुळे योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे.

ताकारी-म्हैसाळ योजनेची अपुर्ण असलेल्या कामांचे कारण पुढे करीत राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या सिंचन व्यवस्थापन विभागाने दोन्ही योजना ताब्यात घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात ताकारी आणि म्हैसाळ योजनेच्या बांधकाम विभागाच्या प्रत्येकी दोन शाखा म्हैसाळ विभाग क्र. 1 ला जोडून सिंचन व्यवस्थापन विभाग सुरू करण्यात आला होता. या विभागाचे मुख्य कार्यालय सांगलीमध्ये असल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना व कर्मचार्‍यांना त्रास होत होता.त्यामुळे ताकारी योजनेसाठी स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग सुरू करण्याची मागणी होती.

प्रामुख्याने ताकारी योजना यशस्वीरित्या चालवून प्रशासनाने दुष्काळावर मात केली आहे. या योजनेतून अतिरिक्त पाणी उचलून आरफळ योजनेतही पाण्याचा पुरवठा केला आहे. योजना सुरळीत सुरू असल्याने कायम दुष्काळी असणार्‍या कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यातील बहुतांशी क्षेत्र लागवडीखाली आले आहे.

ताकारी योजनेचा विचार करता 27 हजार हेक्टर पेक्षाही जास्त लाभक्षेत्र आहे. योजनेवर आजपर्यंत 700 कोटी रुपये खर्चूनही निम्मे क्षेत्रही ओलिताखाली आले नसल्याचे कागदोपत्रांवरून दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात ओलिताखालील क्षेत्र जास्त असल्याचे दिसून येत आहे.कमी लाभक्षेत्र असल्याबाबत योजनेचे अधिकारी अपुर्‍या कर्मचार्‍यांचे कारण देत आले आहेत. किंबहूना ते बरोबरही आहे.राज्यात शासन बदलताच अशा योजनांचे वीजबिल शासन भरणार नसल्याचे जलसंपदा मंत्र्यांनी घोषित केल्याने पाणीपट्टी वसुलीचे महत्व शेतकर्‍यांना समजले आहे.

सिंचन व्यवस्थापन विभागामार्फत योजनेच्या लाभक्षेत्राची मोजणी, पाणीपट्टी आकारणी, वसुली, वीजबिल भरणे, योजना सुरू करणे आणि योग्य प्रमाणात पाण्याचे वितरण करणे अशी कामे केली जातात.सुरवातीला योजनेवर हा विभाग कार्यरत नसल्याने बांधकामच्या कर्मचार्‍यांनाच ही कामे करावी लागत होती. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा पडत होता. त्यामुळे सिंचन व्यवस्थापन विभाग सुरू करण्याची मागणी होत होती. कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण व सिंचन व्यवस्थापन विभागाची मागणीचा विचार करून शासनाने ताकारी-म्हैसाळ योजनेवर स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग सुरू करण्यात आला. यासाठी ताकारी आणि म्हैसाळ योजनेच्या बांधकाम विभागाच्या प्रत्येकी दोन शाखा म्हैसाळ विभाग क्र. 1 ला जोडून ताकारी-म्हैसाळ सिंचन व्यवस्थापन विभाग सांगलीतील वारणालीत सुरू करण्यात आला.

मात्र लाभक्षेत्रापासून मुख्य कार्यालयाचे लांब असलेले अंतर यामुळे शेतकर्‍यांसह कर्मचार्‍यांना त्रास होत होता. यासाठी ताकारी योजनेच्या मुख्य कार्यालयाकडेच सिंचन व्यंवस्थापन विभागाचा कार्यभार देण्याचा प्रस्ताव महामंडळाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाली आहे. योजनेच्या मुख्य कार्यालयाकडे बांधकाम विभागासह सिंचन व्यवस्थापन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.