Tue, Jun 18, 2019 20:54होमपेज › Sangli › तहसीलदारांकडून कारकुनाच्या श्रीमुखात

तहसीलदारांकडून कारकुनाच्या श्रीमुखात

Published On: Dec 07 2017 1:31AM | Last Updated: Dec 07 2017 12:23AM

बुकमार्क करा

इस्लामपूर : शहर वार्ताहर

शिरटे व तांबवे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. दोन दिवस उलटले तरी निवडणूक अधिकारी अर्ज स्वीकारण्यासाठी उपलब्ध नसल्याने  उमेदवारांनी तक्रार केली. दरम्यान, निवडणूक कामात हयगय केली म्हणून तहसीलदार नागेश पाटील यांनी अव्वल कारकून सुनील साळुंखे यांच्या श्रीमुखात लगावली.  

उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत 5 ते 11 डिसेंबरपर्यंत आहे.  गुरूवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. गेले दोन दिवस इच्छुक उमेदवार अर्ज घेऊन तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत हेलपाटे घालत आहेत. 

निवडणूक निर्णय अधिकार्‍याची सही अर्जावर नसल्याने जात पडताळणीचे टोकणही उमेदवारांना मिळाले नाही. बुधवारी दुपारी उमेदवारांनी अर्ज स्वीकारण्यास  अधिकारी उपलब्ध नसल्याचे तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिले. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सुनील साळुंखे यांच्याकडे तहसीलदारांनी विचारणा केली. यावेळी त्यांनी साळुंखे यांच्या श्रीमुखात लगावल्याचे सांगण्यात आले. 

कर्मचार्‍यांकडून निषेध...

तहसीलदारांकडून झालेल्या मारहाणीचा महसूल कर्मचारी संघटनेने निषेध  केला आहे. रात्री उशिरापर्यंत तहसील कार्यालय आवारात कर्मचारी थांबले  होते.