Thu, May 23, 2019 21:14
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › विकास आराखड्यासाठी शहरात टीडीआर लागू

विकास आराखड्यासाठी शहरात टीडीआर लागू

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 18 2018 11:03PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेच्या शहर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी टीडीआर (विकसनाचा हस्तांतर अधिकार) लागू करण्यात आला आहे.  शासनाने अन्य जिल्ह्यांत यापूर्वीच तो लागू केला आहे. या महापालिकेत विलंबाने का होईना तो लागू करण्यात आल्याचे आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. यासंदर्भात नुकतीच शहरातील बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट यांची बैठक घेतल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, शहराचा अंतिम विकास आराखडा चार वर्षांपूर्वी मंजूर झाला आहे. यामध्ये उद्याने, विविध विकासाभिमुख उद्देशाची आरक्षणे विकसित होऊ शकलेली नाहीत. महापालिका त्या जागांची नुकसानभरपाई देऊ शकत नसल्याने त्याची अंमलबजावणी थांबली होती. वास्तविक त्याला टीडीआर हा उत्तम पर्याय आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची सक्‍ती राज्य शासनाने केली आहे. त्यानुसार आता त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतीच नगरविकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांच्याशी चर्चा झाली आहे.खेबुडकर म्हणाले,  शहरातील आरक्षित जागांवर  ती आरक्षणे जागामालक किंवा विकसकामार्फत विकसित करून महापालिकेला देऊ शकतात.

त्या मोबदल्यात त्यांना दुप्पट, तिप्पट एफएसआय टीडीआर रुपाने मिळू शकतो. हा टीडीआर त्याच जागेऐवजी अन्य ठिकाणी ते वापरू शकतात.  विकू शकतात. त्यामुळे प्रत्यक्षात नसले तरी कागदोपत्री ही जागाच त्याला विक्रीसाठी दिल्याचा प्रकार आहे. तो टीडीआर जागेच्या बाजारमूल्याप्रमाणे असेल. तो टीडीआर संबंधित जागामालक, विकसक भविष्यात कधीही दर वाढेल तेव्हा विकू शकतात. हा रोखीपेक्षा मोठा मोबदला आहे.ते म्हणाले, गावठाणमध्ये हा टीडीआर तिप्पट, तर गावठाणाबाहेर दुप्पट असू शकेल. अर्थात यानुसार शहरात बहुमजली इमारती होऊ शकतील. त्यांची मर्यादा 36 मीटरपर्यंत असेल. टीडीआर विकताना तो 9 मीटर, 15 मीटर रस्त्यांच्या अंतरानुसारच इमारतींसाठी योग्य पद्धतीने वापरता, विकता येईल.