Thu, Feb 21, 2019 10:01होमपेज › Sangli › मिरजेत विजयी मिरवणुकीवर तलवार हल्ला, दगडफेक

मिरजेत विजयी मिरवणुकीवर तलवार हल्ला, दगडफेक

Published On: Aug 05 2018 1:33AM | Last Updated: Aug 04 2018 10:52PMमिरज : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या झालेल्या प्रभाग क्र. 3 व 20 मध्ये शुक्रवारी रात्री  हाणामारी  व मिरवणुकांवर दगडफेकीचा प्रकार घडला. या प्रकरणी माजी नगरसेवक महादेव कुरणे यांच्यासह 7 जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभाग क्र. 20 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवार संगीता हारगे यांची विजयी मिरवणूक  सुरू होती.  या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक राधिका हारगे यांनी भाजपचे बसगोंडा पाटील, महादेव कुरणे, रवि हारगे, सचिन हारगे, मनोहर कुरणे, अनिता हारगे आणि सारिका उदगावे यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.  जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी वरील सर्वांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

तसेच संगीता हारगे या विजयी झाल्यानंतर त्यांना हार का घातला असा जाब विचारुन रोहन उदगावे व त्याच्या समर्थकांनी घरात घुसून दमदाटी व घराची कौले फोडल्याची तक्रार एकता पवार यांनी दाखल केली आहे.

प्रभाग क्र. 3 मध्ये मिरवणुकीवर तलवारहल्ला करुन खुनाचा प्रयत्न केला म्हणून सचिन उर्फ पिंटू भोसले, दत्ता भोसले, नयन जाधव, सुधीर जाधव या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचवेळी तलवार हल्ला करणार्‍या सचिन भोसले याच्या रिक्षाची भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याबाबत  भोसले याने भाजपच्या अभिषेक चव्हाण व त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.