Tue, Jun 18, 2019 22:40होमपेज › Sangli › तलवारीच्या धाकाने सात जणांना लुटले  

तलवारीच्या धाकाने सात जणांना लुटले  

Published On: Feb 08 2018 1:53AM | Last Updated: Feb 07 2018 10:48PMमिरज : शहर प्रतिनिधी 

तालुक्यातील बोलवाड फाटा येथे असणार्‍या रेल्वे ब्रीजजवळ सात प्रवाशांना चाकू व तलवारीचा धाक दाखवून सात मोबाईल व लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी चार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते फरार आहेत. बुधवारी पहाटे हा प्रकार घडला, अशी माहिती मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोहन जाधव यांनी दिली. 

दीपक गणपती कदम (रा. अकोला, ता. मंगळवेढा) यांनी तक्रार दिली आहे. कदम हे बांगड्याचे व्यापारी आहेत. ते व अन्य चार असे पाच जण मध्यरात्रीच्या सुमारास चिंचणी यात्रेहून परत सोलापूरकडे निघाले होते. बुधवारी दीड ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास  बोलवाड फाटा येथे असणार्‍या रेल्वे ब्रीजवर त्यांना चौघांनी अडवले. चाकू व तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याजवळची पन्नास हजार रुपयांची रोकड व पाच मोबाईल काढून घेतले. 

त्याच ठिकाणी या चारही चोरट्यांनी नियाज अबू फजल (रा. कुुर्ची) व त्यांचा मित्र अशा दोघांना अडवले. ते ट्रकने कांदा घेऊन दहिवडी वरून हुबळीला निघाले होते. त्यांनाही चाकू व तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडील पस्तीस हजार रुपयांची रोकड, पाच तोळ्यांची चांदीची चेन व दोन मोबाईल असा ऐवज काढून घेतला. ते चोरटे तेथून पसार झाले. कदम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चार चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली असल्याचे निरीक्षक जाधव यांनी सांगितले.