Sun, Feb 24, 2019 10:36



होमपेज › Sangli › बनाळीत मुलाचा संशयास्पद मृत्यू

बनाळीत मुलाचा संशयास्पद मृत्यू

Published On: Feb 11 2018 12:56AM | Last Updated: Feb 11 2018 12:42AM



जत : प्रतिनिधी

तालुक्यातील बनाळी येथील राहुल शिवाजी लोखंडे (वय 17) या मुलाचा शुक्रवारी रात्री संशयास्पद मृत्यू झाला. चालत्या ट्रॅक्टरमधून उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, त्याचा खून झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्‍त केला आहे. अमोल सुभाष सावंत यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास सावंतवाडीकडून बनाळीकडे येत असताना राहुल याने चालत्या ट्रॅक्टरमधून उडी मारली. त्यात तो गंभीर जखमी झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

राहुल याला शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास बनाळीतील एक ट्रॅक्टरमालक काम आहे म्हणून घेऊन गेला होता. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास राहुल याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेस गावातीलच काही लोकांनी फोन केला होता. रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाली होती. मात्र, राहुलचा मृत्यू झाल्याने त्याला रुग्णवाहिकेतून दवाखान्यास घेऊन जाण्यास नकार देण्यात आला.

त्याचा मृतदेह खासगी वाहनाने पहाटे जत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. त्याठिकाणी  शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्याचे पोट, कमर व कमरेखालील भागावर गंभीर दुखापत होऊन रक्‍तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला होता.

राहुलचा रात्री एक वाजता मृत्यू झाला असला तरी त्याची आई व भाऊ यांना पहाटे मृतदेह जतमध्ये आणल्यानंतर या घटनेची माहिती देण्यात आली. त्यामुळे ते संतप्‍त झाले. आपल्या मुलाचा खून करण्यात आला. जखमी झाल्यानंतर त्याच्यावर वेळेत उपचारही करण्यात आले नसल्याचा आरोप त्यांनी केला. आपण याबाबत पोलिसांत तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.