Sat, Jul 20, 2019 09:14होमपेज › Sangli › संशयकल्लोळ, वादावादी अन् तणाव

संशयकल्लोळ, वादावादी अन् तणाव

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 10:06PMसांगली : प्रतिनिधी

महापलिका निवडणुकीसाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात 544 केंद्रांवर बुधवारी सकाळी 7.30 पासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. सकाळपासून संथगतीने मतदान सुरू होते. मतदानादरम्यान काही ठिकाणी संशयकल्लोळ आणि वादाचे वातावरण होते. त्यामुळे अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.प्रभाग 10 मधील राममंदीर चौकातील शाळेच्या मतदान केंद्रात मशीन अचानक बंद पडले. तसेच मिरजेतही असा प्रकार घडला. त्यामुळे उमेदवार व समर्थकांची धावपळ  उडाली. सांगलीत प्रभाग 15 मध्ये ईव्हीएम मशिनच्या विशिष्ट बटणाजवळ शाई लागल्यावरून संशय व्यक्‍त करण्यात आला. शिवाय मशिनवर कोणतेही बटण दाबले की मत भाजपला होत आहे, असाही उमेदवारांनी आरोप केला. 

ही चर्चा वार्‍यासारखी पसरताच सर्वपक्षीय व अपक्ष उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी तसेच समर्थकांनी थेट मतदान केंद्रात धाव घेऊन आक्षेप घेतला. काँगे्रसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, उमेदवार मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, विपुल केरीपाळे, रविंद्र वळवडे,  तसेच अन्य पक्षांचे उमेदवार, प्रतिनिधींनी मतदान प्रक्रियेत घोळ असल्याचा आरोप करीत निवडणूक कक्षातील अधिकार्‍यांना धारेवर धरले. तेथील ईव्हीएम मशीनला भाजपच्या बटणासमोर शाई लागल्यावरूनही हरकत घेतली. त्यांनी प्रक्रियेबाबतच आक्षेप घेतल्याने संशयकल्लोळ निर्माण झाला. यामुळे गदारोळ निर्माण होऊन मतदान थांबले. 

या प्रकाराची माहिती मिळताच शहर पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्यासह मोठा फौजफाटा त्या ठिकाणी दाखल झाला. त्यांनी जमावाला हटविले. तसेच उमेदवार, प्रतिनिधींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ही माहिती मिळताच मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्‍त रविंद्र खेबुडकर, निवडणूक अधिकारी भानुदास गायकवाड आदी या केंद्राकडे धावले. त्यांनी संबंधित उमेदवार व नागरिकांची तक्रार ऐकून घेतली. तेथील बटणावरील शाई पुसून काढली. तसेच सर्वच पक्षांच्या सुचनेनुसार काही मतदारांची मतदानाबाबत चाचणी घेतली. त्यामध्ये कोणताही प्रकार निदर्शनास न आल्याने शंका दूर झाली. परंतु यामुळे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

मतदानादरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. विश्‍वजित कदम, जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे संजय बजाज, कमलाकर पाटील, युवानेते विशाल पाटील, शिवसेना नेते शेखर माने, स्वाभिमानीचे नेते पृथ्वीराज पवार, गौतम पवार आदींसह सर्वच नेत्यांनी शहरभर फिरत प्रक्रियेवर  लक्ष ठेवले होते. 

मिरजेतही एका केंद्रात मतदानादरम्यान मशीन बंद असल्याची तक्रार आली. अधिकार्‍यांनी तत्काळ चाचणी करून ही शंका दूर केली. सर्वच प्रभागांमध्ये उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधी मतदान केंद्रांजवळ ठाण मांडून होते.काही प्रभागामध्ये मतदारांना बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरल्याच्या संशयावरूनही मतदार, समर्थकांत बाबाचीचे प्रकार सुरू होती. प्रभाग 10 मध्ये एका पक्षाच्या समर्थक माजी महापौरांनाही या वादावादीतून पोलिसांनी ताब्यात घेतले.  सर्वच प्रभागामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी उमेदवार, समर्थकांत चुरस सुरू होती. दुसरीकडे मतदारांना अमिष दाखविणे, मशिनमधील गोंधळ यामुळे संशयकल्लोळ व सर्व प्रकारातून वादावादीमुळे तणावाचे वातावरण होते. परंतु सुदैवाने कोठेही गैरप्रकार घडले नाहीत.

चोख बंदोबस्त अन् अचूक यंत्रणा

मतदान निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी पोलिसांनी मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरात जमावबंदी करून प्रवेशास मज्जाव केला होता. त्यासाठी पोलिस फौजफाटा सज्ज होता. एकूण 544 मतदार केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 3604 अधिकारी, कर्मचार्‍यांचा राबता होता. आयुक्‍त खेबुडकर, निवडणूक अधिकारी भानुदास गायकवाड, तुषार ठोंबरे, बाळासाहेब वाघमोडे, स्मिता कुलकर्णी, संजय पाटील, उपायुक्‍त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील आदी अधिकार्‍यांसह पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक शशिकांत बोर्‍हाटे यांच्यासह अधिकार्‍यांनी प्रक्रिया पार पाडली.

मतदानाची संथगती

18 प्रभागांमध्ये चार सदस्यीय पॅनेलसाठी चौघांना तर सांगलीवाडी व मिरजेतील प्रभागामध्ये त्रिसदस्यीय पॅनेलसाठी तिघांना मतदान करावयाचे होते. रविंद्र खेबुडकर यांनी सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांसाठी उत्साही वातावरण व्हावे यासाठी सजावट, रांगोळी फलक, झावळ्या लावून स्वागताचे आवाहन केले होते. त्यानुसार तशी तयारीही केली होती. पण मतदारांमधील निरुत्साहामुळे मतदानाची गती संथ होती. दुसरीकडे ईव्हीएमवर चार उमेदवारांना मत देण्यासाठी वेळ लागत होता. त्यामुळे रांगांमुळे मतदार थांबून -थांबून येत होते. त्याचाही मतदानावर परिणाम झाला.

सांगलीवाडीत उत्साह, इर्ष्या

सांगलीवाडी येथे सर्वच मतदान केंद्रावर उत्साह होता. प्रमुख उमेदवारांबरोबरच अपक्ष उमेदवारांच्या समर्थकांनीही इर्षेने यंत्रणा राबविली. दिवसभर मतदानकेंद्रावर उत्साह होता. मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. उमेदवार आणि प्रमुख नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी दिवसभर मतदानकेंद्रांवर ठाण मांडले होते. महिला मतदारांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते. मतदाना दरम्यान मतदारांमध्ये दिवसभर उत्साह होता.