Sun, Jan 20, 2019 10:51होमपेज › Sangli › शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलला 31 पर्यंत स्थगिती

शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलला 31 पर्यंत स्थगिती

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 08 2018 1:51AMसांगली : प्रतिनिधी

खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या शासन निर्णयाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दि. 31 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे, अशी माहिती सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनीदिली. 

सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासनाने दि. 20 जून 2018 रोजी परिपत्रक काढून खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेचे अधिकार संस्थाचालकांकडून काढून शासनाकडे घेतले आहेत. शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करून उमेदवार व संस्थांना ऑनलाईन नोंदणीचे आवाहन केलेले आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात संस्था चालकांमध्ये नाराजीचा सूर होता. 

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्यावतीने सहसचिव रविंद्र फडणवीस व 100 संस्थाचालकांनी नागपूर खंडपीठासमोर याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली आहे. पवित्र पोर्टलद्वारे होणार्‍या शिक्षक भरती प्रक्रियेला दि. 31 ऑगस्टपर्यंत न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

संस्थाचालकांनी पोर्टलवर माहिती भरू नये : पाटील

शिक्षण संस्था संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील म्हणाले, नागपूर खंडपीठाने पवित्र पोर्टलद्वारे होणार्‍या शिक्षक भरतीला दि. 31 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्याचे संस्थाचालकांकडून जोरदार स्वागत होत आहे. पवित्र पोर्टल प्रक्रियेला न्यायालयीन स्थगिती असल्याने सर्व संस्थाचालकांनी ऑनलाईन पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात माहितीची नोंदणी करू नये. शिक्षण सेवक भरतीचा अधिकार संस्था चालकांकडेच रहावेत यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ आंदोलन व न्यायालयानी लढ्याद्वारे प्रयत्नशील आहे.