Fri, Apr 26, 2019 09:42होमपेज › Sangli › स्वच्छता निरीक्षक निलंबित; चौघांवर टांगती तलवार

स्वच्छता निरीक्षक निलंबित; चौघांवर टांगती तलवार

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 1:27AMसांगली : प्रतिनिधी

कामात दिरंगाई, फाईल अडवाअडवीच्या कारभाराचे आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी नुकतेच स्टिंग ऑपरेशन केले. यामध्ये बांधकाम विभागाने दडविलेल्या सव्वा कोटीं रुपयांच्या फायलीही त्यांनी स्वत:च शोधून काढून त्यांचा पंचनामा केला. या व अशा अनेक कारणांसाठी अधिकारी, कर्मचार्‍यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. स्वच्छता निरीक्षक रवींद्र दामटे यांना निलंबित केले. अन्य चार कर्मचार्‍यांना निलंबित करा, असे आदेश कामगार अधिकार्‍यांना  दिले आहेत.

महापालिकेतील सर्वच कार्यालयांत अनागोंदी कारभार सुरू आहे. यामुळे नागरिक, नगरसेवकही हैराण झाले आहेत. एकूणच अक्षम्य दिरंगाई, कामाच्या फायली दडवून ठेवणे, असे प्रकार सुरू आहेत. स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.  वारंवार सूचना देऊनही कारभार न सुधारल्याबद्दल खेबुडकर यांनी दामटे यांना निलंबित केले. श्री. खेबुडकर यांनी बांधकाम विभागातील 1 कोटी 24 लाख रुपयांच्या चरी मुजवण्याच्या कामाच्या फाईलवर दि. 27 एप्रिल रोजी सही केली होती. परंतु, बांधकाम विभागाकडे पुढच्या प्रक्रियेसाठी पाठवलेली फाईल बांधकाम विभागातील कर्मचारी समीर जामदार यांनी जाणीवपूर्वक लपवून ठेवल्याचे चव्हाट्यावर आले. याबाबत चौकशी केल्यानंतर फाईल हरवली आहे, सापडत नाही, असे ते सांगत होते. त्यामुळे तक्रारी आल्यानंतर खेबुडकर हे अचानक बांधकाम विभागात गेले. त्यांनी अधिकार्‍यांच्या कार्यालयात लपवून ठेवलेली फाईल शोधून काढली. 

या कामाचे बिल का काढले नाही? फाईल का सापडत नाही? असा प्रश्‍नांचा भडिमार केला.  कामात अक्षम्य दिरंगाई दाखवल्याबद्दल श्री. खेबुडकर यांनी जमादार यांच्यावरही निलंबनाची कारवाईचे आदेश दिले आहेत. याच विभागातील सौ. मंगल फोंडे यांच्या कामात हलगर्जीपणा आयुक्‍तांना दिसून आला. ठेेकेदार संघटनेने त्यांच्याविरुद्ध  आयुक्‍तांकडे तक्रारी केल्या होत्या. रजेचा अर्ज न देता त्या अनेक दिवस परस्पर कामावर गैरहजर असल्याचे दिसून आले. आयुक्‍तांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिले. 

सहायक मुकादम आंनद कुदळे, रमेश मद्रासी यांच्या कामांबाबतही अनेक तक्रारी होत्या. स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आढळून आला. एका स्वयंसेवी संस्थेने कचरा गोळा करून रस्त्याच्या कडेला ठेवला होता. तो उचलून न्यावा, अशी  मागणी संस्थेने आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी तसे सहाय्यक मुकादमाला आदेश दिलेले असताना कचरा उचलला गेला नाही. त्यामुळे     या दोघांनाही आयुक्‍तांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.