Thu, Apr 25, 2019 08:15होमपेज › Sangli › एस. टी.च्या १६ कर्मचार्‍यांचे निलंबन स्थगित

एस. टी.च्या १६ कर्मचार्‍यांचे निलंबन स्थगित

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 09 2018 10:16PMमिरज : प्रतिनिधी

एस.टी. संपाच्या दुसर्‍या दिवशी कामावर हजर होऊन पुन्हा अचानक संपावर गेलेल्या 16 वाहक, चालकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली; परंतु लगेच वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानुसार निलंबन आदेशाला तात्पुरती स्थगितीही देण्यात आली आहे. वरिष्ठ आगार प्रमुख बी. बी.नाईक यांनी  निलंबनाची कारवाई केली होती. 

निलंबन करण्यात आलेल्या 16 जणांमध्ये 14 सेवेत कायम असलेल्या चालक-वाहकांचा आणि 2 हंगामी चालकांचा समावेश होता. हे कर्मचारी संपाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी कामावर हजर झाले; परंतु लगेच त्यांनी काम अर्धवट सोडून संपात सहभाग घेतला होता. पगारवाढीच्या मागणीसाठी एस.टी. कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या दुसर्‍या दिवशीही मिरज आगारातून काही किरकोळ फेर्‍या वगळता शहर व ग्रामीण बस वाहतूक ठप्प होती. कर्नाटकातून होणारी एस.टी. वाहतूकही बंद राहिल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. एस.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे रेल्वेला प्रवाशांची गर्दी वाढली होती.

मिरज आगारातून दररोज शहरी 166,  ग्रामीणच्या 130 आणि कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे 150 हून अधिक फेर्‍या होतात. संप न मिटल्याने एस.टी. वाहतूक ठप्प होती. त्यामुळे वडाप, रिक्षा व वडाप गाड्यांना प्रवाशांची गर्दी होती. जादा दराने ही वाहतूक होताना दिसून येत होती.