Sun, Sep 23, 2018 08:32



होमपेज › Sangli › विद्यार्थ्यांकडून पैसे उकळणारा सहायक उपनिरीक्षक निलंबित

विद्यार्थ्यांकडून पैसे उकळणारा सहायक उपनिरीक्षक निलंबित

Published On: Sep 12 2018 1:49AM | Last Updated: Sep 11 2018 11:53PM



सांगली : प्रतिनिधी

जेवण केल्यानंतर मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर फिरायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यात नेऊन त्यांच्याकडून पैसे उकळणार्‍या सहायक पोलिस उपनिरीक्षकास सोमवारी रात्री निलंबित करण्यात आले. बाबासाहेब पाटील असे त्याचे नाव आहे.  या प्रकाराचे सांगली जिल्हा सुधार समितीने व्हिडीओ चित्रीकरण करून तक्रार केली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सोमवारी रात्री निलंबनाची कारवाई केली. 

मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील दोन विद्यार्थी जेवणानंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर गेले होते. त्यावेळी गस्तीच्या पोलिसांनी त्यांना का फिरत आहात, अशी विचारणा केली. त्यांना  जबरदस्तीने गाडीत बसवून मिरज शहर पोलिस ठाण्यात नेले होते.

दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुधार समितीच्या नितीन मोरे यांना मदतीसाठी पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळी  बाबासाहेब पाटील याने या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये द्या, अन्यथा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली. समितीच्या मोरे यांनी कांबळे यांना याचा जाब विचारला. पण विद्यार्थ्यांचं शिक्षण व पुढील आयुष्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाटील याला दोन हजार रुपये देतो, गुन्हा दाखल करू नये अशी विनंती केली. 

पाटील व विद्यार्थ्यांच्या पालकांमधील संवाद  मोरे यांनी मोबाईलमधील रेकॉर्ड केला होता. याची चित्रफीत सोशल मिडियावरून व्हायरलही झाली होती. यासंदर्भात समितीने अधीक्षक  शर्मा यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे त्यांनी पाटीलला तडकाफडकी निलंबित केले. 

यापुढे  गोरगरीब जनतेची लुबाडणूक करणार्‍यांना असाच धडा शिकवला जाईल. कायदा हा सामान्यांच्या रक्षणासाठी वापरण्यासाठी सुधार समिती कायम सक्रिय राहिल, असे समितीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे  तानाजी रुईकर, रविंद्र ढोबळे, जयंत जाधव, युवराज नायकवाडे, प्रवीण कोकरे यांनी पत्रकारांना  सांगितले.

शर्मा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मिरजेचे पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती यांची नियुक्ती केली आहे. चौकशीचा अहवाल तातडीने सादर करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे. तसेच पाटील याची खातेनिहाय चौकशीही करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईने मिरज शहर पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.