Wed, Jun 26, 2019 17:29होमपेज › Sangli › काँग्रेसने देश घडविला; सुबत्ता आणली

काँग्रेसने देश घडविला; सुबत्ता आणली

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 15 2018 10:56PMवाळवा : प्रतिनिधी

काँग्रेसने गेल्या 60 वर्षात काय केले, असे पंतप्रधान विचारतात, मी त्यांना सांगतो, काँग्रेसने देश घडविला. ग्रामीण भारतातल्या शेतकर्‍यांच्या दारात चारचाकी गाडी उभा राहिली. आधुनिक सुख-सुविधा निर्माण झाल्या. यामध्ये सर्वात मोठा हिस्सा काँग्रेसचा आहे, असे प्रतिपादन भारताचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी वाळवा येथे बोलताना केले.

पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शे.का. पक्षाचे आ. भाई जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते. सुशिलकुमार शिंदे, आ. भाई जयंत पाटील, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांतिसिंह नाना पाटील, हुतात्मा किसन अहिर यांना पुष्पचक्र वाहण्यात आले. 

सुशिलकुमार शिंदे म्हणाले, आज नवी पिढी क्रांतिवीर नागनाथअण्णा, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा इतिहास विसरत चालली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात धगधगत्या आगीमध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी हे क्रांतीकारक लढले. त्यांचे कार्य किती मोठे होेते याचा अंदाजही नव्या पिढीला करता येणार नाही. अण्णांनी स्वातंत्र्यानंतरही परिवर्तनाचे फार मोठे काम केले. देशाला आता त्या परिवर्तनाच्या चळवळीची गरज आहे. 

भाई जयंत पाटील म्हणाले, क्रांतिवीर नागनाथअण्णा, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारात घडलो. अण्णांचे कार्य ग्रिनीज बुकात लिहिण्यासारखे आहे. आज इतिहास पुसण्याचे काम राज्यकर्ते करीत आहेत. अशावेळी विद्यापीठातून नवीन पिढीला हा क्रांतीचा इतिहास समजला पाहिजे. त्यासाठी अभ्यास वर्ग घेतले पाहिजेत. या परिसरात भाजपाचे उमेदवार निवडून येतात याची खंत वाटते. बदल झाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येवूया, असे त्यांनी आवाहन केले. 

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, जीवंत हुतात्मा म्हणूनच नागनाथअण्णा जगले. विधायक रचनात्मक, शैक्षणिक कामांची त्यांनी सुरूवात केली. सशस्त्र क्रांतीमधून देशाला स्वातंत्र्य मिळाले. मग शेतकर्‍यांच्या विकासातून नवीन क्रांती करता येते. ही अण्णांची भुमिका होती. त्यांच्या विचारांचा वसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविला पाहिजे. 

वैभव  नायकवडी म्हणाले, क्रांतिवीर अण्णांनी महान योद्ध्याप्रमाणे अखेरपर्यंत समाजासाठी काम केले. सर्व उपेक्षितांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर अनेक चळवळी उभा केल्या. त्यामुळेच धरणग्रस्त, दुष्काळग्रस्त, शेतकरी सर्वांना याचा लाभ झाला. कुसुमताई नायकवडी यांचेही भाषण झाले. बाळासाहेब नायकवडी यांनी आभार मानले. 

यावेळी हुतात्माचे उपाध्यक्ष बाबुराव बोरगावकर, डॉ. बाबुराव गुरव, माजी आ. शिवाजीराव काळुंगे, दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, जि.प. महिला व बालकल्याण सभापती प्राचार्य डॉ. सुषमा नायकवडी, बझारच्या कार्यवाह नंदिनी नायकवडी, कार्यकारी संचालक दिपक पाटील, बाळासाहेब पाटील, सावकर कदम, वसंत वाजे, मोहन सव्वाशे, सरपंच डॉ. शुभांगी माळी, डॉ. अशोक माळी, पोपट अहिर, हुतात्माच्या माजी उपाध्यक्षा वंदना माने आदी मान्यवर उपस्थित होते.