Thu, Nov 22, 2018 02:31होमपेज › Sangli › हायड्रोकार्बन वायू शोधण्यास सर्वेक्षण

हायड्रोकार्बन वायू शोधण्यास सर्वेक्षण

Published On: May 25 2018 1:11AM | Last Updated: May 24 2018 11:36PMमिरज : प्रतिनिधी

भूगर्भातील हायड्रोकार्बन वायू शोधण्यासाठी मिरज शहरासह तालुक्यात चार ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले आहे. निश्‍चित करण्यात आलेल्या जागेत दोनशे फूट खोलीपर्यंत बोअर घेण्यात आले आहे. येत्या आठ ते पंधरा दिवसांत तज्ज्ञांमार्फत येथे हायड्रोकार्बन वायू उपलब्ध आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. भूगर्भात खनिज तेलाचा साठा असेल, तर तो शोधण्यास या सर्वेक्षणाची मदत होणार आहे.

मिरज-पंढरपूर रस्त्यालगत शेत जमिनीमध्ये दोन ठिकाणी, कुपवाड आणि मालगाव येथे प्रत्येकी एका ठिकाणी हायड्रोकार्बन वायू शोधण्यासाठी  बोअर मारण्यात आले आहे. हा उपक्रम ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनतर्फे करण्यात येत आहे. राज्यात 25 जिल्ह्यांमध्ये अशी तपासणी करण्यात येत आहे. यासाठी सुमारे 650 कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे.

देशातील  गाळयुक्‍त  अज्ञात खोर्‍यांमध्ये हायड्रोकार्बनचे साठे असण्याची शक्यता तपासण्याच्या दृष्टीने टू-डी सेस्मिक डेटा संकलित करण्याचे काम ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनकडे सोपविण्यात आले आहे. हे काम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या माध्यमातून करवून घेण्यात येणार आहे.  या संकलित  डेटाच्या आधारे शासनास हायड्रोकार्बनच्या साठ्यांचा शोध घेण्यास मदत होणार आहे. अनुकूल निष्कर्ष मिळाल्यास खनिज तेलाचे साठे असणार्‍या राज्यांच्या यादीत महाराष्ट्रासही स्थान मिळणार आहे. तसेच रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने उद्योगधंद्यामध्येही वाढ होऊ  शकेल. यातून अकुशल कामगारांसाठी किमन चार वर्षे रोजगार उपलब्ध होणार आहे. 

अत्याधुनिक मशीनने  जागेची निवड केली जाते.  जागेच्या मालकास माहिती दिली जाते. त्यानंतर निश्‍चित केलेल्या जागेत बोअर घेण्यात येते. त्यानंतर 8 ते 15 दिवसांत तज्ज्ञांमार्फत भूगर्भामध्ये हायड्रोकार्बन वायू आहे की नाही याची तपासणी केली जाते. संबंधीत जागेत बागायत क्षेत्र असेल तर  नुकसान भरपाई देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

कर्मचार्‍यांना संरक्षणाच्या सुचना

तसेच या  अथडळा आल्यास सर्वेक्षण  करणार्‍या कर्मचार्‍यांना संरक्षण देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांना उपसचिव डॉ. संतोष भोगले यांनी दिल्या आहेत.