Thu, Apr 18, 2019 16:28होमपेज › Sangli › मटका बुकी रडारवर!

मटका बुकी रडारवर!

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 9:00PMसांगली : अभिजित बसुगडे

जिल्ह्यात मटक्यासह जुगार पूर्णपणे उघड बंद आहे. चोरून व्हॉटसअ‍ॅपसह अन्य सोशल मीडियाद्वारे जरी असे अवैध व्यवसाय सुरू असले तरी त्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. मटका बुकी, जुगारी माझ्या रडारवर आहेतच पण आता त्यांचे आश्रयदातेही माझ्या रडारवर आले आहेत. त्यांचा योग्य तो बंदोबस्त करू, अशी माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली. 

अधीक्षक शर्मा म्हणाले, गेल्या चार महिन्यात जिल्ह्यातून मटका हद्दपार करण्यात पोलिस दलाला यश आले आहे. तरीही काहींच्या जीवावर जुगारी चोरून मटका घेत असतील तर त्यांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. यावेळी आमच्या कारवाईच्या आड येणार्‍या त्यांच्या आश्रयदात्यांचा कोणताही दबाव घेणार नाही. किंबहुना मटका, जुगारासारख्या अवैध व्यवसायांच्या पाठिराख्यांचेही कंबरडे कायदेशीररित्या मोडण्यास पोलिस दल कमी पडणार नाही. 

मटका, जुगारासह पोलिस दलाने अवैध वाळू, दारू वाहतुकीवरही प्रभावी कारवाई केली आहे. नागज येथे कायमस्वरूपी पोलिस पथक नेमण्यात आले आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविणारेही माझ्या रडारवर आहेत. त्यांना वेळ येताच चांगलाच दणका देण्यात येईल. महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कोठेही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. आतापर्यंत केलेल्या कारवाईवेळी कोणताही राजकीय दबाव आला नाही. आणि जरी दबाव आला तरी त्याला दाद दिली जाणार नाही. गुंडांवर कारवाई करताना कोण कोणाजवळ आहे किंवा कोणाशी ओळख आहे याचा विचार केला जाणार नाही, असेही अधीक्षक शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले. 

सांगलीसह जिल्ह्यात कोठेही अवैध व्यवसाय सुरू असल्यास नागरिकांनी थेट नियंत्रण कक्षात माहिती द्यावी. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. सर्व अवैध व्यवसाय जिल्ह्यातून हद्दपार करायचे असल्यास नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बेकायदेशीर कृत्यांची माहिती देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहनही अधीक्षक शर्मा यांनी यावेळी केले.