Thu, Apr 25, 2019 12:11होमपेज › Sangli › सर्व गेमसह जुगारावर कडक कारवाई करणार

सर्व गेमसह जुगारावर कडक कारवाई करणार

Published On: Dec 13 2017 1:58AM | Last Updated: Dec 13 2017 12:37AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

व्हिडीओ गेममध्ये चालत असलेल्या जुगारामुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्याबाबत माझ्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यामुळेच रविवारी रात्री सांगलीतील व्हिडीओ गेमवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. शासनाची परवानगी असली तरी तेथे बेकायदा जुगार सुरू असेल तर येथून पुढेही कडक कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. 

रविवारी रात्री सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या तीन पथकांनी स्टार, देवा आणि क्‍लासिक व्हिडिओ पार्लरवर छापे टाकले होते. यावेळी 52 मशीन आणि रोकड असा 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी नगरसेवक जुबेर चौधरीसह सहाजणांना अटक करण्यात आली होती. अधीक्षक शर्मा यांनी व्हिडिओ गेम पार्लरसह सर्व प्रकारचे गेम, जुगार, मटका यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. 

मनोरंजनात्मक गेमसाठी ही पार्लर असताना तेथे जुगार चालत असल्याने तेथे कारवाई केल्याचे शर्मा यांनी सांगितले. ते म्हणाले, ही कारवाई करण्यापूर्वी संबंधित पार्लरचे मालक न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेवर दिलेल्या निकालानुसारच पोलिसांना ही कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच या कारवाईत गुप्तता पाळल्याने कारवाई यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. 

कच्ची नोंद बंद करण्याचे आदेश दिल्याने काही महिने गुन्ह्यांत वाढ झाल्याचे दिसून येईल. अगदी एक हजार रुपयांचा मोबाईल चोरीला गेला तरी त्याबाबत गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व गुन्हे रेकॉर्डवर येतील व त्याचा तपास करणे सोयीस्कर होणार आहे. 

रविवारी व्हिडिओ गेमवर केलेल्या कारवाईबाबत जर कोणी न्यायालयात गेले तर पोलिस दलही न्यायालयात म्हणणे मांडेल, असे शर्मा म्हणाले. यामागे कितीही मोठे लोक असू देत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा जुगार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.