होमपेज › Sangli › मातेची मुलीसह आत्महत्या

मातेची मुलीसह आत्महत्या

Published On: May 14 2018 1:40AM | Last Updated: May 14 2018 1:40AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील विकासनगर येथे तीन वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन मातेने आत्महत्या केली. पूजा राजेश चौगुले (वय 21), सृष्टी राजेश चौगुले (वय 3) अशी मृतांची नावे आहेत.  लग्‍नात मोटारसायकल न दिल्याने सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पती राजेश मीलन चौगुले (वय 29), सासू लक्ष्मी ऊर्फ बाळाबाई मीलन चौगुले (वय 45) यांना अटक करण्यात आली आहे. 

रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पूजाची आई संगीता आनंदा दाभाडे (वय 45, रा. नेज, ता. चिकोडी) यांनी फिर्याद दिली आहे. पतीसह सासूविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा आणि राजेशचा विवाह 2012 मध्ये झाला होता. त्यावेळी सासरच्या मंडळींनी हुंडा म्हणून मोटारसायकलची मागणी केली होती. मात्र, विवाह होऊन बरेच दिवस झाले तरी पूजाच्या माहेरच्या मंडळींनी मोटारसायकल न दिल्याने सासरच्या मंडळींनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला होता. लग्‍नानंतर चौगुले कुटुंब काही दिवस कोल्हापूर येथे, तर काही दिवस अहमदनगर येथे मजुरीसाठी वास्तव्यास होते. गेल्या काही वर्षापासून हे कुटंब सांगलीतील विकासनगरमधील बाटली कारखान्याजवळ स्थायीक झाले होते. राजेश गवंडी काम करीत होता. लग्न झाल्यापासून सासरच्या मंडळींकडून मोटारसायकलसाठी वारंवार तिला उपाशीही ठेवण्यात आले होते. या त्रासाला पूजा कंटाळली होती. शनिवारी रात्री अकरानंतर मुलगी सृष्टीला घेऊन बाहेर पडली होती. रात्री उशीरापर्यंत ती परत न आल्याने नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. 

रविवारी सकाळी पंचशीलनगर आणि विकासनगरच्या मधील खुल्या भूखंडात असलेल्या विहिरीत दोन मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आयुष्य हेल्पलाईन टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांची ओळख पटली. दरम्यान पूजाने मुलीसह आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर तिच्या माहेरची मंडळी मोठ्या संख्येने सांगलीत आली होती. सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अशोक विरकर, निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांनी भेट दिली. अधिक तपास उपअधीक्षक विरकर करीत आहेत. 

हृदय पिळवटणारा आक्रोश

पूजाच्या माहेरच्या मंडळी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी जमा झाले होते. मुलीसह तिने आत्महत्या केल्याचे पाहताच त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. चिमुकल्या सृष्टीने आईला मारलेली घट्ट मिठी पाहून अनेकांचा बांध फुटला. माय-लेकींच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.