होमपेज › Sangli › बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Published On: May 31 2018 1:46AM | Last Updated: May 30 2018 11:43PMसांगली : प्रतिनिधी

बारावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने कर्नाळ (ता. मिरज) येथील प्रणव दुष्यंत माने (वय 18)  या युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.  सांगलीतील दुसर्‍या घटनेत नापास झाल्याने एकाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ओंकार विजय काळे (वय 19, रा. मोती चौक, बापट मळा) असे त्याचे नाव आहे. त्याची प्रकृती अत्यवस्थ असून त्याच्यावर सिव्हील हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

प्रणव माने  सांगली हायस्कूलमध्ये वाणिज्य शाखेत बारावीत तो शिकत होता. बुधवारी बारावीचा ऑनलाईन निकाल होता. त्यामुळे तो सकाळी साडेआठच्या सुमारास घरात कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडला होता. सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याने रेल्वेखाली उडी घेतली.  ओंकार काळे  चिंतामणराव व्यापार महाविद्यालयात वाणिज्य शाखेत बारावीत शिकतो.   निकाल पाहून त्याने आईला चार विषयात नापास झाल्याचे फोनवरून सांगितले होते. घरी आल्यानंतर कोणाशीही काहीही न बोलता तो दुसर्‍या मजल्यावर गेला. तिथे त्याने ओढणीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.   प्रणवने नापास होण्याच्या भीतीपोटी निकालापूर्वीच आत्महत्या केली. दुपारी निकाल लागल्यानंतर तो तीन विषयात नापास झाल्याचे स्पष्ट झाले. ओंकारने मात्र निकाल पाहिल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. तो चार विषयात नापास झाला आहे. 

पालकांनी धीर देऊनही दोघांचे टोकाचे पाऊल...

बुधवारी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार असल्याचे दोघांच्याही पालकांना माहित होते. प्रणवला त्याच्या वडिलांनी निकाल काहीही लागो चिंता करू नको असे सांगितले होते. तरीही सकाळी त्याने निकालापूर्वीच रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान ओंकारच्या वडिलांनीही सकाळी घरातून बाहेर पडताना त्याला धीर दिला होता. निकाल काहीही लागो मनाला लावून घेऊ नको असेही सांगितले होते. तरीही ओंकारने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांच्याही पालकांनी धीर देऊनही त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.