Sun, Jul 21, 2019 14:08होमपेज › Sangli › बोरगावमध्ये  विवाहितेची गळफासाने आत्महत्या

बोरगावमध्ये  विवाहितेची गळफासाने आत्महत्या

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 17 2018 11:48PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे एका युवकाच्या त्रासाला कंटाळून  रूपाली महादेव वंजारी (वय 37, रा. बोरगाव, वंजारी मळा) या विवाहितेने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. मृत रूपाली या  तलाठी महादेव वंजारी यांच्या पत्नी होत. रूपाली यांच्या मुलीला मानसिक त्रास व पतीला जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांना आत्महत्येस भाग पाडल्याप्रकरणी चार संशयितांविरोधात इस्लामपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. किशोर वंजारी, भैय्या प्रकाश वंजारी, मोनिका पांडुरंग वंजारी, विकास पांडुरंग वंजारी (सर्व रा. बोरगाव) अशी संशयितांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : रूपाली व तिचे पती महादेव  बोरगाव येथे वास्तव्यास आहेत. महादेव हे इस्लामपूर येथे तलाठी आहेत.त्यांना  एक मुलगी व एक मुलगा अशी  दोन अपत्ये आहेत. सोमवारी रात्री  8.30 वाजण्याच्या सुमारास पतीसह सर्वांनी एकत्र जेवण केले. रात्री 11.30 वाजण्याच्या दरम्यान पती महादेव, मुलगा सिद्धांत हे दोघेजण घराच्या दुसर्‍या मजल्यावर झोपायला गेले. तर मुलगी सलोनी व रूपाली घरातील दुसर्‍या खोलीत झोपायला गेल्या. 

मंगळवारी सकाळी 6.30 च्या सुमारास सलोनी  हिने  महादेव झोपलेल्या खोलीचा दरवाजा ठोठावला आणि मोठ्याने हाका मारायला सुरूवात केली. सलोनी घाबरलेली होती. पती महादेव यांनी रूपाली यांच्या खोलीत जाऊन पाहिले तेव्हा तिने साडीने गळफास लावून घेतल्याचे त्यांना दिसले. त्यांनी भाऊ प्रकाश याच्या मदतीने रूपाली यांना तातडीने खासगी रुग्णालयात  दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

आत्महत्त्येचे कारण...

रूपाली यांच्या आत्महत्त्येनंतर येथील उपजिल्हा रुग्णालयात  उत्तरीय तपासणी करण्यात आली.महादेव यांनी मुलीला विश्‍वासात घेऊन चौकशी केली. त्यावेळी सलोनी हिने आईला किशोर हा त्रास देत असल्याचे सांगितले. तसेच आईने  ठेवलेली चिठ्ठी ही वडिलांना दिली.     

किशोरला तिघांची मदत...

फिर्यादीत महादेव वंजारी यांनी म्हटले आहे की,  भावकीतील किशोर हा मुलगी सलोनीला त्रास देत होता. याची माहितीही किशोरच्या वडिलांना  दिली होती. त्याचा राग मनात धरून किशोर हा मला  व घरच्यांना घरासमोर येऊन शिवीगाळ करीत असे. त्याकडे आम्ही दुर्लक्ष केले. त्यानंतर रूपाली यांना वारंवार फोन करून मलाही जीवे मारण्याची धमकी देत होता. तसेच मुलीलाही मानसिक त्रास देत होता. भैय्या, मोनिका, विकास हे तिघेजण किशोरला मदत करीत होते. रूपाली हिने किशोर याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्त्या केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे अधिक तपास करीत आहेत.

माझ्या मुलांची काळजी घ्या

मी, किशोर वंजारीमुळे आत्महत्या करीत आहे. त्याने माझ्या मुलीला व मला मानसिक त्रास दिला आहे. यामध्ये भैय्या, मोनी, विकी सामील आहेत. मला माफ करा. मी स्वत:ला संपवत आहे. माझ्या मुलांची काळजी घ्या. मला माफ करा, असे रूपाली हिने चिठ्ठीत लिहिले आहे.