Fri, Aug 23, 2019 14:26होमपेज › Sangli › संशयिताच्या पत्नीची विहिरीत उडी टाकून आत्महत्या

संशयिताच्या पत्नीची विहिरीत उडी टाकून आत्महत्या

Published On: Aug 21 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 11:22PMआष्टा : प्रतिनिधी

नागाव (ता. वाळवा) येथील कृष्णात अण्णासाहेब शिसाळे (वय 35) यांच्या  खूनप्रकरणातील संशयित अमोल खंडेराव पाटील (रा. नागाव) याची पत्नी स्वप्ना (वय 28) हिने गावातीलच विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याचे सोमवारी उघडकीस आले. आष्टा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : या प्रकरणातील संशयित अमोल पाटील हा गंभीर जखमी असून सांगली तील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. अमोलची पत्नी स्वप्ना ही रविवारी पहाटेपासून बेपत्ता होती. त्यामुळे  या  खून प्रकरणाचे गूढ वाढले होते. याबाबत संशयिताचा भाऊ विजय याने आष्टा पोलिस ठाण्यात स्वप्ना बेपत्ता झाल्याची वर्दी दिली होती. नातेवाईक व पोलिसांनी शोध घेऊनही तिचा ठावठिकाणी समजला नव्हता.

सोमवारी सायंकाळी संशयित अमोल पाटील याच्या घरापासून दीडशे ते दोनशे  फुटांवर असलेल्या  एका विहिरीत स्वप्ना हिचा मृतदेह तरंगत असल्याचे काहींनी पाहिले. त्यांनी पोलिसपाटलांना ही माहिती दिली. आष्टा पोलिसांनी पंचनामा करून लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. उत्तरीय तपासणीसाठी आष्टा ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्याठिकाणी शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आपली पत्नी व कृष्णात यांच्यामध्ये अनैतिक संबंध आहेत, असा अमोलला संशय होता. याच कारणावरून अमोल याने शनिवारी (दि. 18 ) रोजी  सायंकाळी कृष्णात यांच्यावर धारदार शस्त्राने 58 वार करून त्यांचा खून केला होता, अशी तक्रार आहे.