Tue, Apr 23, 2019 19:36होमपेज › Sangli › सांगलीत तरुणाची गळफासाने आत्महत्या

सांगलीत तरुणाची गळफासाने आत्महत्या

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 22 2018 12:17AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील शंभर फुटी रस्ता परिसरातील रामकृष्ण परमहंस सोसायटीत एका तरुणाने राहत्या घरी दोरीने आढ्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सीताराम जकाप्पा बिराजदार (वय 32, रा. दत्तनगर) असे त्यांचे नाव आहे. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी मारहाण केल्यामुळेच सीताराम यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी पत्रकारांशी बोलताना केला. बिराजदार पत्नी व दोन मुलांसमवेत दत्तनगर येथे राहत होते. त्यांची आई आणि भाऊ रामकृष्ण परमहंस सोसायटीत राहतात. मंगळवारी दुपारी ते आईच्या घरी गेले होते. तेथे गेल्यानंतर पोलिसांनी मारहाण केल्याचे त्यांनी आई आणि भावाला सांगितले. 

त्यानंतर त्यांनी भावाला चिकन आणण्यासाठी म्हणून, तसेच आईलाही घरातून बाहेर पाठवून दिले. दोघेही घरातून गेल्यानंतर लाकडी आढ्याला त्यांनी दोरीने गळफास घेतला. दुपारी साडेतीनच्या सुमारास आई आणि भाऊ परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

सीताराम यांच्यावर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई करून त्यांना  पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांची मोटारसायकलही जप्त केली होती. त्यावेळी पोलिसांशी वादावादी झाल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्याचा भाऊ रवी आणि आई भागीरथी यांनी पत्रकारांशी बोलताना केला. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली आहे. 

तक्रारीची चौकशी करू : बोराटे

दरम्यान  बिराजदार यांनी नेमक्या कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याचा तपास केला जाईल. नातेवाईकांनी रितसर तक्रार द्यावी त्यानंतर त्याची सखोल चौकशी करून नंतर कार्यवाही करण्यात येईल, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.