Fri, Apr 26, 2019 03:37होमपेज › Sangli › सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्षांचा गावकऱ्यांसोबत मुक्काम (व्हिडिओ) 

सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्षांचा गावकऱ्यांसोबत मुक्काम (व्हिडिओ) 

Published On: Dec 27 2017 1:25PM | Last Updated: Dec 27 2017 1:25PM

बुकमार्क करा

विटा : विजय लाळे  

"सध्या कसलीही निवडणूक नसताना आमच्या गावात येऊन कोणीतरी आमचे प्रश्न समजून घेतंय यातच आम्हाला समाधान आहे , रेशन कार्ड मिळवून देणं, प्राथमिक शाळांच्या इमारतींची दुरावस्था बघून त्यावर उपाय काढला आन कॉलेजच्या पोरांच्या एसटी बासचा प्रश्न सुटला तरी बास.’’या भावना आहेत सांगली जिल्ह्यातील रेणावी आणि वेजेगावच्या ग्रामस्थांच्या. 

सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि आमदार अनिलराव बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांनी एक मुक्काम गावकऱ्यांसोबत हा उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत ते सध्या खानापूर तालुक्यातील एका गावात सायंकाळी ५ ते दुसऱ्या दिवशी ८ वाजेपर्यंत मुक्काम करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत आहेत. खानापूर तालुक्यातील रेणावी आणि वेजेगाव या गावांत त्यांचा हा उपक्रम झाला. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्हा आणि तालुका पातळीवरचे विविध विभागाचे अधिकारी बाबर यांच्या सोबत होते.

ग्रामस्थांच्यामध्ये एकाच वेळी औत्सुक्य, आनंदाच्या आणि नावीन्याच्या भावना होत्या. ज्या खानापूर तालुक्यात त्यांनी उपसभापती म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला; त्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोकांच्या सध्या समस्या काय आहेत? हे समजून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. गाव  कुसात राहणाऱ्या सगळ्याच लोकांना तालुक्याच्या ठिकाणी येता येत नाही. अशा लोकांपर्यंत बाबर पोहचत आहेत. समस्या छोट्या असोत  किंवा मोठ्या असोत त्‍यांना भिडल्या शिवाय त्या सुटणार नाहीत, अशी बाबर यांची धारणा आहे. यावेळी प्राथमिक शाळा, शाळांचा परिसर , विट्याकडे शाळा कॉलेजेसाठी येणाऱ्या विध्यार्थांचे प्रश्न, एसटीचे प्रश्न, गावांतील ग्रामपंचायतीचे स्वच्छतेचे धोरण, लोकांचे शेतीविषयक विविध प्रश्न, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती देणे तसेच पंचायत राज व्यवस्थेच्या कक्षेत येणाऱ्या विविध वैयक्तिक लाभाच्या आणि सामुहिक पातळीवरच्या योजनांची माहिती देऊन संबंधितांना यात समाविष्ट करून घेणे वगैरे गोष्टी या उपक्रमात समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे राजकारण विसरून सुरु  केलेल्या उपक्रमाला ग्रामस्थ सुद्धा पक्ष भेद, गट, तट बाजूला ठेवून सहभागी होताना दिसत आहेत.