Thu, Jul 18, 2019 00:48होमपेज › Sangli › ऊस दराच्या कपातीविरोधात 17 रोजी मोर्चा

ऊस दराच्या कपातीविरोधात 17 रोजी मोर्चा

Published On: Feb 13 2018 2:00AM | Last Updated: Feb 13 2018 12:09AMसांगली  ः प्रतिनिधी

उसाची पहिली उचल जी ठरलेेली होती, त्यामध्ये साखर कारखान्यांनी कपात करून प्रतिटन 2500 रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. याला  तीव्र विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. 17  रोजी कोल्हापूर येथील सहसंचालक साखर याच्या कार्यालयावर खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली  मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सयाजी मोरे, भागवत जाधव, महेश खराडे यांनी दिली. 

मोरे म्हणाले की, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी साखरेच्या दराचे कारण पुढे करून प्रतिटन 500 रूपये कपात करणार असल्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे कारखान्यांनी कपात करून शेतकर्‍यांच्या  खात्यांवर 2500 रूपये वर्ग केले आहेत. यामुळे शेतकर्‍यांना सुमारे 200 कोटी रूपयांचा फटका बसलेला आहे. यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारने मध्यस्थी करून दरात कपात करण्यात देऊ नये, अशी मागणीदेखील केली होती. 

जाधव म्हणाले, मात्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी टनामागे सरासरी 500 रूपयांची कपात केले आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्न मिटलेला होता. मात्र, आता त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपीची मोडतोड करून बिले वर्ग केली आहेत, त्या साखर कारखान्यांवर त्वरित गुन्हे दाखल करणे आवश्यक होते. मात्र तसे होताना दिसत नाही. साखरेच्या दरात थोडीशी सुधारणा झालेली दिसत आहे. मुळात साखरेच्या दरात 8 रूपये किलोमागे  पडले आहेत. त्यामुळे राज्य बँकेने साखरेचे मूल्यांकनदेखील कमी केले आहे. केवळ 2 रूपये दरात सुधारणा होऊन शेतकर्‍यांना फायदा णार नाही. या मागणीसाठी दि. 17 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथील प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्या कार्यालयावर  मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी हे करणार आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी या मोर्चास उपस्थित राहणार आहेत.

यावेळी  युवा आघाडीचे अध्यक्ष  संजय बेले, उपाध्यक्ष  महावीर पाटील, पलूस  तालुकाध्यक्ष  जयकुमार कोले, संदीप राजोबा, विकासराव देशमुख, भारत साजणे, राम पाटील, सनी गडगे उपस्थित होते.