Tue, Mar 26, 2019 21:52होमपेज › Sangli › साखर कारखानदारांची पुरती कोंडी!

साखर कारखानदारांची पुरती कोंडी!

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 08 2018 7:31PMसांगली : विवेक दाभोळे 

साखर दरातील अस्थिरता आणि दरातील घसरण यामुळे कारखानदारांची पुरती कोंडी झाली आहे. एकीकडे उसाला चांगला दर देण्यासाठी  ऊसउत्पादकांचा वाढता दबाव तर दुसरीकडे साखरेचे जादा उत्पादन आणि कमी झालेले दर यामुळे साखरसम्राट  कोंडीत सापडले आहेत.

कारखानदार यातून कसा मार्ग काढतात याकडे तमाम ऊसउत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे. तर साखरेच्या ढासळत्या दराची जबाबदारी कोणाची याचा चेंडू कारखानदार आणि राज्यकर्ते एकमेकांकडे ढकलू लागले आहेत. तीन साडेतीन वर्षांपूर्वी डॉ. सी. रंगराजन समितीच्या बहुचर्चित शिफारशी स्वीकारत तत्कालीन राज्यकर्त्यांनी साखर उद्योगाला नियंत्रणमुक्ती दिल्याची घोषणा केली. मात्र  सरकारचे मार्चपासूनचे निर्णय या नियंत्रणमुक्तीला छेेद देत
आहेत.

 तीन वर्षांपूर्वीपयर्ंत कारखान्यांना साखर विक्रीसाठी मासिक कोटा पद्धत होती, ती  रद्द करण्यात आली. यामागे साखरेचे दर नियंत्रणात राहिले पाहिजेत, असे सरकारने त्यावेळी सांगितले होते.  यामुळे  कारखान्यांना मिळेल त्या दराने साखर विकावी लागत आहे. आता उत्पादन वाढू लागल्याने  दर झपाट्याने कोसळू लागले आहेत. ऑक्टोबर 2015 मध्ये साखरेचे भाव 1900 रु. प्रतिक्विंटल होते. सन 2016 च्या ऑगस्टमध्ये 3500 ते 3700 रु. च्या घरात गेली.  मासिक कोटा पद्धतीने पुन्हा साखर 3250 रु. च्या घरात आली.  ऑक्टोबर 2017 मध्ये 3800 रु. असलेली साखर 2800 रु. पर्यंत खाली आली आहे.  सरकारने   दर नियंत्रित ठेवण्यासाठी साखर आयातीचा निर्णय घेतला. तर आयात शुल्क दुप्पट करुन ते शंभर टक्के केले. मात्र याच्या फायद्याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.