Mon, May 20, 2019 22:25होमपेज › Sangli › ऊस वाहतूकदारांची कोट्यवधींची फसवणूक

ऊस वाहतूकदारांची कोट्यवधींची फसवणूक

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 8:58PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

साखर कारखान्यांशी करार करून ऊस पुरविणार्‍या ट्रॅक्टर मालकांची तोडणी कामगार व मुकादमांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. सुमारे 25 टोळ्यांनी वाहतूकदारांकडून लाखो रुपयांचा अ‍ॅडव्हान्स घेऊन पोबारा केला आहे. हे वाहतूकदार शेतकरी आहेत. याप्रकरणी शेतकरी संघटना आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रचारप्रमुख संजय कोले यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, फसवणूक करणार्‍यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. 

ते म्हणाले, धुळे व बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी मजूर टोळ्यांनी ट्रॅक्टर मालकांकडून प्रत्येकी लाखो रुपये उचल घेतली आहे. कारखाना परिसरात टोळ्या आल्याही होत्या. मात्र दोन दिवसात त्या गायब झाल्या. त्यानंतर ट्रॅक्टरमालक धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील दोंडाईची गावातील मुकादमाकडे पैसे परत मागण्यासाठी गेले असता, त्यांना ठार मारण्याची भीती घालून प्रत्येकाचे मोबाईल व 9 लाखांची रोकड काढून घेतली. तेथील स्थानिक पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली असता तेथील अधिकार्‍यांनी यातून फार काही निष्पन्न होणार नाही, असे सांगितले. 

त्यानंतर संबंधित ट्रॅक्टर मालकांनी सांगलीच्या पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. फसवणूक झालेले ट्रॅक्टरमालक मूळचे शेती करणारे आहेत. त्यांनी याबाबत शेतकरी संघटनेशी संपर्क केला आहे. त्यामुळे आमची संघटना या गंभीर प्रश्‍नी पाठपुरावा करणार आहे. टोळ्यांनी पळून जाणे, फसवणूक करणे ही बाब उसतोडीसाठी गंभीर आहे, असेही कोले यावेळी म्हणाले.

महांकाली कारखान्याकडील 25, सोनहिरा कारखान्याकडील 52, राजारामबापू कारखान्याकडील 49, सर्वोदयच्या 15, हुतात्माच्या 20 टोळ्यांनी ट्रॅक्टर मालकांकडून लाखो रुपयांचा अ‍ॅडव्हान्स घेऊन पोबारा केला आहे. ट्रॅक्टर मालकांनी ज्या कारखान्यांकडून पैसे उचलले होते त्यांच्या व जामिनदारांच्या ऊस बिलातून पैसे वसूल केले जात आहेत. टोळ्यांनी फसवल्याने हा प्रश्‍न गंभीर बनला आहे. कारखान्यांनी त्यांना सहकार्य केले पाहिजे. 

फसवणूक करणार्‍या मुकादम, मजुरांवर फौजदारी दाखल करा. पैसे वसूल करावेत. कारखान्यांनी पाच वर्षासाठी समान हप्त्यात वसुली करावी. तिसरा पक्ष म्हणून कारखान्याने करारात सामील होऊन जबाबदारी स्वीकारावी अशा मागण्याही कोले यांनी यावेळी केल्या. 

या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सुनील फराटे, वसंत भिसे, शंकर मोहिते, मोहन परमणे, आण्णा पाटील, राजगोंडा मगदूम आदी उपस्थित होते.