Tue, Mar 19, 2019 09:14होमपेज › Sangli › साखरेचा दर घसरल्याने गूळही नरमला

साखरेचा दर घसरल्याने गूळही नरमला

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 14 2018 8:37PMसांगली : प्रतिनिधी

साखरेच्या घसरलेल्या दराचा थेट परिणाम गुळाच्या दरावर झाला आहे. गुळाला गिर्‍हाईकही कमी आहे. क्विंटलला 200 रुपयांनी दर घसरला आहे. हळदीचे दर मात्र वाढले आहेत. पिवळा बेदाणा किलोला दहा रुपये मंदीत, तर हिरवा बेदाणा किलोला 10 रुपये तेजीत आहे. 

सांगली मार्केट यार्डात आठवड्यात गुळाची आवक 8 हजार रवे व 20 हजार भेली आहे. रवे 30 किलोचे, तर भेली 10 किलोच्या आहेत. एक किलो पॅकिंगमधील गुळाचीही आवक आहे. सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा म्हणाले, साखरेच्या घसरलेल्या दराचा परिणाम गुळावर झाला आहे. गुळाला क्विंटलला 2700 ते 3200 रुपये दर आहे. सुमारे 200 रुपयांनी दर घसरला आहे. गुळाला मागणी कमी असल्याचा झटकाही दराला बसला आहे. 

सांगली मार्केट यार्डात आठवड्यात राजापुरी हळदीची आवक 1 लाख 4 हजार क्विंटल, तर परपेठ हळदीची आवक 22 हजार क्विंटल आहे. किमान 6 हजार ते कमाल 13 हजार रुपये भाव आहे. परपेठ हळदीला किमान 5 हजार 864 ते 8 हजार 271 रुपये दर मिळाला. राजापुरी चांगल्या क्वालिटीच्या हळदीचा भाव क्विंटलला 8 हजार 500 रुपयांपर्यंत आहे. 

हिरव्या बेदाण्याला किलोला 140 ते 250 रुपये, पिवळ्या बेदाण्याला किलोला 130 ते 180 रुपये दर मिळाला. पिवळा बेदाणा 10 रुपये मंदीत, तर हिरवा बेदाणा 10 रुपये तेजीत आहे. डॅमेज्ड काळ्या बेदाण्याला किलोला 60 ते 80 रुपये दर आहे, अशी माहिती सांगली-तासगाव बेदाणा मर्चंटस् असोसिएशनचे संचालक राजू कुंभार यांनी दिली. 

मक्याचा क्विंटलचा भाव 1300 रुपयांपर्यंत झाला होता. मक्याचा वाढलेला दर कमी झाला आहे. क्विंटलला 1200 ते 1250 रुपये दर आहे. शंभर ते पन्नास रुपयांनी दर कमी  झाला आहे. मक्याची आवक कर्नाटकमधील आहे, अशी माहिती मक्याचे व्यापारी आर. टी. कुंभार यांनी दिली. 

आठवड्यात हायब्रीड ज्वारीची  आवक 708 क्विंटल आहे. क्विंटलला 1700 ते 1793 रुपये दर आहे. शाळुची आवक 1524 क्विंटल आहे. क्विंटलला 1786 ते 2814 रुपये दर आहे. बाजरीची आवक 415 क्विंटल  आहे. बाजरीचा क्विंटलचा भाव 1475 ते 1729 रुपये आहे. गव्हाची आवक 2 हजार 266 क्विंटल आहे. क्विंटलचा भाव  1793 ते 2714 रुपये आहे. 

Tags : sangli, Sugar, prices fell, sangli news,