Mon, Mar 25, 2019 09:08होमपेज › Sangli › साखर निर्यात : मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटणार

साखर निर्यात : मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटणार

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 18 2018 10:20PMसांगली : प्रतिनिधी

अतिरिक्‍त साठ्यामुळे साखर दराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यासाठीच महाराष्ट्राच्या कोट्यातील 6 लाख 21 हजार टन साखर निर्यात करण्यास परवानगी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच भेटणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. साखर निर्यात झाल्यास प्रतिटन 55 रुपयांप्राणे कारखान्यांना अनुदान मिळेल. त्याचा लाभ उत्पादक शेतकर्‍यांनाही मिळेल, असे ते म्हणाले.

देशमुख म्हणाले, यावर्षी ऊस क्षेत्र जास्त असल्याने नियमित वेळेपेक्षा दोन महिने आधीच साखर कारखान्यांना गाळपास परवानगी दिली होती. त्यामुळे यावेळी उत्पादन जास्त आणि मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारखान्यांकडे अतिरिक्‍त साखर पडून आहे. दरही उतरले आहेत. यावर पर्याय म्हणून आम्ही साखर निर्यातीसंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे. शिवाय महाराष्ट्राच्या वाट्याची किमान 6 लाख 21 हजार टन साखर अन्य देशात निर्यातीस परवानगी मिळावी, अशी मागणीही मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटून करणार आहेत. जीएसटीबाबतही काही करता येते का, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ते म्हणाले, साखर निर्यात झाल्यास प्रतिटन 55 रुपयांप्रमाणे कारखान्यांना अनुदान देता येईल. त्यामुळे त्याचा लाभ उत्पादकांनाही देण्याबाबत कारखान्यांना बंधन घालू. ते म्हणाले, पुढील वर्षी हे संकट येऊ नये यासाठी राज्य सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यावर्षी ऑक्टोबरपासूनच प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पहिले दोन महिने साखर कारखान्यांनी कच्ची साखर काढावी. तसेच ज्या कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मितीची सोय आहे त्यांनी त्याचेच उत्पादन करावे. त्यामुळे आवश्यक तेवढीच साखर निर्मिती होईल. साखरेचे भाव स्थिर करण्यात मदत होईल.