Mon, Jun 24, 2019 16:39होमपेज › Sangli › वाळवा-शिराळ्यात महाडिकांचा सवता सुभा!

वाळवा-शिराळ्यात महाडिकांचा सवता सुभा!

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 20 2018 7:43PMइस्लामपूर : प्रतिनिधी

वाळवा - शिराळ्यात विधानसभा निवडणुकीसाठी आजवर इतरांना पाठिंबा देऊन त्यांच्या विजयासाठी झटणार्‍या तालुक्यातील नानासाहेब महाडिक गटाने आता इस्लामपूर व शिराळा विधानसभेसाठी ‘सवता सुभा’ मांडला आहे. त्यामुळे दोन्हीकडील सत्तारुढांच्या विरोधात असणार्‍या विरोधकांत दुफळीचे चित्र दिसत आहे. 

कृष्णा - वारणा खोर्‍यातील या दोन्ही तालुक्यात इस्लामपूर व शिराळा हे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. दोन्हीही विधानसभा मतदारसंघांची मतदार संख्या 2.25 लाखाच्या पुढे आहे. वाळव्याकडील 48 गावे शिराळा मतदारसंघात येतात. या गावांची मतदारसंख्या शिराळा तालुक्यापेक्षा अधिक म्हणजे 1 लाखापुढे आहे. या परिसरातील पेठ-रेठरेधरण व येलूर परिसरातील दोन्हीही जिल्हा परिषद मतदारसंघांवर नानासाहेब महाडिक व त्यांचे सुपुत्र पं.स. सदस्य राहुल महाडिक, माजी जि.प. सदस्य सम्राट महाडिक यांचे वर्चस्व आहे. ते  त्यांनी सिध्दही केले आहे. 

त्याचबरोबर महाडिक गटाने दोन्हीही तालुक्यात नेटवर्क वाढविले आहे. शिराळ्यातील तत्कालीन आमदारांच्या विजयामध्ये या महाडिक गटाची भूमिका निर्णायक राहिली आहे.  आता आधीच्या ‘तिरंगी’ ऐवजी ‘चौरंगी’चीही चर्चा आहे. इकडे इस्लामपूर मतदारसंघातून यावेळी मैदानात उतरण्याचा चंग वाळवा पंचायत समिती विकास आघाडीचे गटनेते राहुल महाडिक यांनी बांधला आहे. इस्लामपूर पालिकेत सत्तांतर होतानादेखील हा गट सक्रिय होता. या गटासह ना. सदाभाऊ खोत, भाजपचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह काँगे्रस, शिवसेना, रिपाई, मनसे आदिंच्या विकास आघाडीने इस्लामपुरात राष्ट्रवादीला हादरा दिला. आजवर येथूनही सतत राष्ट्रवादी नेत्यांशी विधानसभा अन् विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी संघर्ष करण्यात अग्रभागी असणारा महाडिक गट आता थेट मैदानात उतरण्याची तयारी करीत आहे. अगदी आष्टा नगरपालिका निवडणुकीतही नगराध्यक्षपदाच्या महाडिक गटाच्या उमेदवाराला मिळालेली मते दुर्लक्षून चालणार नाहीत.