होमपेज › Sangli › रस्त्यांच्या दर्जाबाबत प्रमाणपत्र सादर करा

रस्त्यांच्या दर्जाबाबत प्रमाणपत्र सादर करा

Published On: Dec 07 2017 1:31AM | Last Updated: Dec 07 2017 12:26AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

रस्ता दुरुस्तीबाबत गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक,महाविद्यालयीन तरूणी, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित सरपंच अशा 5 व्यक्तींचे प्रमाणपत्र सादर करावे.  चांगले काम करणार्‍यांना बक्षीस देऊन प्रोत्साहन देणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील 50 अधिकार्‍यांना मी स्वखर्चातून भेटवस्तू देणार आहे, अशी माहिती   सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली. 

जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांसमवेत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.  आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विलासराव जगताप   उपस्थित होते.त्यांनी यावेळी अधिकार्‍यांच्या  सुचना,   अडचणीही  जाणून घेतल्या. 

ते म्हणाले, खड्डेमुक्तीसाठी मंत्रालयात वॉररूम सुरू केली आहे. आठ तासांच्या तीन पाळ्यांमध्ये काम सुरू आहे. या वॉररुमला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे.   सांगलीसह 30 जिल्ह्यांना भेट दिली आहे. गेल्या तीन वर्षांत 2 हजार जणांना बढत्या दिल्या आहेत. मात्र, चुकीचे वागणार्‍यांवर कडक कारवाई करीत 200 जणांना निलंबितही केले आहे. 

ते म्हणाले, आजची बैठक ही केवळ कर्मचार्‍यांशी सुसंवाद साधण्यासाठी आहे.  तुमच्यापैकी किती जण दिवसातील काही वेळ स्वतःसाठी देतात, किती जण आपल्या पत्नीचे विचार शांतपणे ऐकून घेतात, किती जण सामाजिक कार्य करतात, किती जण घरी एकत्र जेवण घेतात, किती जण आपल्या मुला-बाळांना विश्वासात घेतात आणि विश्वास देतात हे सुद्धा महत्वाचे आहे.  

ते म्हणाले, नव्या चांगल्या संकल्पना मांडा. स्वीकारा आणि अंमलात आणा. अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पश्चिम विभाग आणि मिरज विभागाच्या कामांचा आढावा यावेळी घेतला. 

कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण आणि डी. एस. जाधव, सर्व उपअभियंता, शाखा अभियंता व अन्य अधिकारी उपस्थित होते. भाऊसाहेब साळुंखे, पूजा बारटक्के, अजयकुमार ठोंबरे, एस. व्ही. बारवेकर, एस. बी. सोलनकर, शिवानंद बोलीशेट्टी आदी उपस्थित होते.