Thu, Jul 18, 2019 02:26होमपेज › Sangli › नेत्यांना मुंबईतील बैठकीची प्रतीक्षा

नेत्यांना मुंबईतील बैठकीची प्रतीक्षा

Published On: Jun 28 2018 1:35AM | Last Updated: Jun 27 2018 8:38PMसांगली : शशिकांत शिंदे 

जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांबाबत  आठ दिवसांत  आजी- माजी खासदार आणि आमदार यांची मुंबईत बैठक  घेण्याचे आश्‍वासन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभेत दिले होते. आता तीन आठवडे झाले तरी अद्याप  या बैठकीबाबत कोणताच निरोप आलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख मंत्र्यांबरोबर बैठक होणार कधी आणि प्रश्‍न मार्गी लागणार कधी, याची प्रतीक्षा आता जिल्ह्यातील नेत्यांना आहे. 

एकेकाळी जिल्ह्यातील नेत्यांकडे सत्तेतील महत्त्वाची पदे होती. जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवण्याबाबत बैठका आणि निर्णय घेण्याचा धडाका सुरू असायचा. आता त्याच जिल्ह्यातील नेत्यांना  मंत्र्यांच्या भेटीसाठी वेळ मिळेनाशी झाली आहे.  भाजपला चार आमदार आणि एक खासदार देऊनही जिल्ह्यावर ही परिस्थिती ओढवली आहे. 

जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तीन जूनरोजी  झाली होती. खासदार संजय पाटील, खासदार राजू शेट्टी, आमदार आदी  उपस्थित होते. 
 बैठकीत खासदार शेट्टी, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार अनिल बाबर, माजी मंत्री अजितराव घोरपडे आदिंनी  रखडलेल्या विविध प्रश्‍नासंदर्भात  अधिकार्‍यांना  धारेवर धरले होते. नागरिकांचे प्रश्‍न सुटणार कधी, अशी विचारणा केली होती. त्यावेळी पालकमंत्री देशमुख आणि खासदार पाटील यांनी हे प्रश्‍न अधिकार्‍यांच्या पातळीवर सुटणार नाहीत तर यासाठी आठ दिवसांत अर्थ, वन, ऊर्जा, पाटबंधारे खात्याच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत यासाठी बैठक घेण्यात येईल. त्यात हे प्रश्‍न मार्गी लागतील, असे आश्‍वासन दिले होते.

शेट्टी  यांनी पाच वर्षांपासून नवीन वीज कनेक्शन नाहीत. महावितरणची  कामे थांबलेली आहेत. पैसा विदर्भात जात आहे. अजून त्यांचा अनुशेष किती आहे. आमची कामे होणार कधी, असा सवाल केला होता. माजी आमदार घोरपडे यांनी चार वर्षांत सिंचन योजनेतील कामाचे एकही टेंडर निघाले नाही. पाणी पुरवठ्याचे विविध प्रश्‍न सुटणार कधी, असे  प्रश्‍न उपस्थित केले होते.  

आमदार बाबर यांनी नवीन वीज कनेक्शन, ठिबकचे थकित अनुदान कधी मिळणार आदी मुद्दे  उपस्थित केले होते. आमदार नाईक यांनी चांदोली परिसरातील विकासाबाबत बैठकीतच रुद्रावतार धारण केला होता. यावर मंत्री देशमुख आणि खासदार पाटील  यांनी  हे प्रश्‍न सोडविण्याबाबत  संबंधित मंत्र्यांची मुंबईत  बैठक घेण्यात येईल.  त्यात हे प्रश्‍न मार्गी लागतील, असे आश्‍वासन दिले होते. 

पाणी आहे  पण वीज कनेक्शन नसल्याने ते पिकांना देता येत नाही. वीज कनेक्शनसाठी लागणार्‍या साहित्याचे पैसे आम्ही आता देतो नंतर ते बिलातून वजा करून घ्या, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.  त्यासाठी बँकेमार्फत कर्ज देण्याचीही तयारी माजी राज्यमंत्री घोरपडे यांची आहे. तरीसुद्धा याबाबत निर्णय होत नाही.

आदेश देऊनही जनता दरबार नाहीच

नियोजन सभेत  महावितरणच्या कारभारबाबत जोरदार  वादळी चर्चा झाली होती. अधिकारी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नसल्याचा आरोप नेत्यांनी केला होता. त्यावर पालकमंत्री देशमुख आणि खासदार पाटील यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांनी  आठवड्याला जनता दरबार घेऊन प्रश्‍न सोडवण्याचे आदेश दिले होते. मात्र, अधिकार्‍यांनी अद्याप जनता दरबार घेण्यास सुरुवात केलेली नाही. त्यामुळे लोकांचे प्रश्‍न जैसे थे  आहेत. 

अनुपस्थित अधिकार्‍यांवर कारवाईची केवळ घोषणाच

नियोजन समितीच्या सभेला  वन, सिव्हिल आदी विविध विभागाचे  अधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी कमालीचे  संतप्त झाले होते. हे अधिकारी आतापर्यंत एकाही बैठकीला आले नाहीत. त्यामुळे त्यांची जिल्ह्यातून बदली करुन कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती.