Sun, Sep 23, 2018 06:03



होमपेज › Sangli › उपनिरीक्षक चव्हाण, शिपाई कांबळेवर ठपका

उपनिरीक्षक चव्हाण, शिपाई कांबळेवर ठपका

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 12 2018 11:56PM



सांगली : वार्ताहर

अनिकेत कोथळे खून प्रकरणातील प्रमुख संशयित बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे याने अनिकेत कोथळे व अमोल भंडारे पोलिस कोठडीमधून पळून गेल्याचा बनाव केला होता, असा आरोप सीआयडीने त्यांच्या आरोपपत्रात केला आहे. याप्रकरणी खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक समीर सुरेश चव्हाण, शिपाई अक्षय नेमगोंडा कांबळे यांच्यावर आरोपपत्रात ठपका ठेवण्यात आला आहे.वाटमारीच्या आरोपावरून सांगली शहर पोलिसांनी दि. 5 नोव्हेंबर 2017 रोजी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे यांना अटक  केली होती. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

पोलिस कोठडीत असताना तपास अधिकारी युवराज कामटे व त्याच्या सहकारी पोलिसांनी डीबी रुममध्ये आणून अनिकेतवर थर्ड डिग्रीचा वापर केला होता. त्याला उलटे टांगून काठीने बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीतच अनिकेतचा मृत्यू झाला असा आरोप आहे. या खुनात आपण अडकले जाऊ म्हणून   कामटे याने स्टेशन डायरीमध्ये दोघेही पळून गेल्याची तक्रार नोंदविली होती. अनिकेत कोथळे व अमोल भंडारे लॉकअपमधून पळाल्याची कामटे याने तक्रार नोंदविली होती. त्यावेळी उपनिरीक्षक चव्हाण यांच्याकडे पोलिस ठाण्याचा कार्यभार होता.

अनिकेतच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह मोटारीतून घेऊन कामटे व त्याचे साथीदार  दोन तास फिरत होते. सुरुवातीला एका खासगी दवाखान्यात त्यानंतर सांगलीच्या स्मशानभूमीपर्यंत मृतदेह फिरविण्यात आला. त्यावेळी मृतदेहसोबत शिपाई अक्षय कांबळे तीन तास होता. त्याने या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली नसल्याचा ठपका आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. कामटे आणि त्याच्या साथीदारांनी अनिकेतचा मृतदेह आंबोली (जि. सिंधूदुर्ग) येथे नेऊन जाळला व ते दोघे पळून गेल्याचे भासविण्यात आले. दुसर्‍या दिवशी कामटे व त्याच्या साथीदार पोलिसांनी तसेच वातावरण तयार केले.
या प्रकरणाची दखल घेत पोलिस अधिक्षकांनी पोलिस उपनिरीक्षक समीर चव्हाण व शिपाई अक्षय कांबळे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित केले होते. याप्रकरणी  कोथळे याचा खून व ते दोघे लॉकअपमधून पळून गेल्याचे स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. सीआयडी या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करीत आहे. दोघे लॉकअपमधून पळून गेल्याचा गुन्ह्याचा अहवाल आज न्यायालयात सादर करण्यात आला. 

युवराज कामटेची तक्रार खोटी

अनिकेत कोथळे व अमोल भंडारे लॉक अपमधून पळून गेल्याची युवराज कामटे याची तक्रार खोटी आहे. स्वत:चा बचाव करण्यासाठी कामटे याने त्याच्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग केला व स्वत:च्या फायद्याकरिता बनावट कागदपत्रे तयार केल्याचा ठपका या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी, निरीक्षक गीता बागवडे, बाळासाहेब पवार, राकेश इंदुलकर, अमोल ठाकूर आदींनी आरोपपत्र तयार करण्यासाठी प्रयत्न केले.