Fri, Apr 19, 2019 12:39होमपेज › Sangli › विद्यार्थी अजूनही भाड्याच्या इमारतीतच

विद्यार्थी अजूनही भाड्याच्या इमारतीतच

Published On: Dec 13 2017 1:59AM | Last Updated: Dec 12 2017 9:53PM

बुकमार्क करा

इस्लामपूर : संदीप माने

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे उद्घाटन होऊन दीड वर्ष उलटले आहे. परंतु अद्यापि खासगी इमारतीतून विद्यार्थ्यांचे नव्या इमारतीत स्थलांतर झालेले नाही. इमारतीच्या भाड्याचा भुर्दंड मात्र शासनालाच सोसावा लागत आहे. 

दत्त टेकडी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर   मागासवर्गीय शासकीय वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटन दि. 20 मे 2016 रोजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडले होते. मात्र या इमारतीत विद्यार्थी - विद्यार्थिनींचे स्थलांतर अजूनही झालेले नाही. 

मुलींच्या व मुलांच्या वसतिगृह इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी 10 कोटी 60 लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. या नव्या वसतिगृहात 200 विद्यार्थी-विद्यार्थिनी राहू शकणार आहेत. इमारतीतील मूलभूत सुविधा पूर्ण झालेल्या नाहीत.  वसतिगृहाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता झालेला नाही. नवीन इमारतीसाठी विद्युत कनेक्शन जोडण्यात आलेले नाहीत. वीजपुरवठ्याच्या दृष्टीने स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसविला नाही. 

संरक्षक भिंत, चौकीदार रुम, सायकल स्टँण्ड, सेप्टीक टँक, पोर्चसाठी रोलिंग, पेव्हिंग ब्लॉक, अंतर्गत रस्ते, बागबगीचा, सांडपाण्याच्या ड्रेनेजची व्यवस्था इत्यादी कामे अपूर्ण स्थितीत आहेत. पिण्याचे व अन्य खर्चासाठीचे पाणी आदी सुविधा अजूनही अधांतरीच आहेत. सध्याचे वसतिगृह भाड्याच्या इमारतीत आहे. त्यासाठी  50 हजार रुपये भाडे मोजावे लागते आहे. वसतिगृहाचीकामे अपूर्ण असतानाही मंत्र्यांच्या उपस्थितीत  उद्घाटनाचा कार्यक्रम का घेण्यात आला, हा संशोधनाचा विषय आहे. नंतरच्या काळातही सुविधांची कामे करण्यात आली नाहीत.