Tue, Jul 23, 2019 02:44होमपेज › Sangli › कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 09 2018 11:36PMसांगली : प्रतिनिधी

हरिपूर (ता. मिरज) येथील गजानन कॉलनीत राहणार्‍या दहावीच्या विद्यार्थ्याने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. साहिल उदय कोलवेकर (वय 15) असे त्याचे नाव आहे. त्याला दहावीत 53 टक्के गुण मिळाले आहेत. निकाल पाहिल्यानंतर त्याने मित्र, नातेवाईकांना पेढेही वाटले. मात्र, रात्री कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली. 

साहिल आई, वडील, भावासमवेत सांगली-हरिपूर रस्त्यावरील गजानन कॉलनीत राहत होता. तो इमॅन्युअल इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिकत होता.  शुक्रवारी दुपारी दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. साहिल दुपारीच निकाल पाहून घरी आला होता. त्यानंतर सायंकाळी त्याने गणपतीचे दर्शन घेतले.  उत्तीर्ण झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ त्याने पेढे घेतले. त्याचे मित्र आणि नातेवाईकांना पेढे वाटून तो रात्री घरी आला होता. 

त्याचे आई, वडील घराबाहेर बसलेले असताना त्याने बेडरूममधील पंख्याला ओढणीने गळफास घेतला. तो बराच वेळ घरातून बाहेर न आल्याने घरच्यांनी बेडरूममध्ये पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. रात्री उशीरा उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

दहावीत 53 टक्के गुण मिळवल्यानंतरही साहिलने आत्महत्या का केली याचेच सर्वांना आश्‍चर्य वाटत आहे. शिवाय त्याने पेढेही वाटले होते. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

वडिलांना जबर धक्का

दहावीत चांगले गुण मिळवूनही साहिलने आत्महत्या केल्याने त्याच्या घरच्या लोकांना जबर धक्का बसला आहे. दरम्यान कमी गुण मिळाल्यानेच त्याने आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.