होमपेज › Sangli › भाजपच्या इच्छुकांचे जोरदार शक्तिप्रदर्शनभाजपच्या इच्छुकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

भाजपच्या इच्छुकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

Published On: Jul 02 2018 1:48AM | Last Updated: Jul 01 2018 9:36PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे रविवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी सांगली शहरातील इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारीची मागणी केली.  इच्छुकांच्या समर्थकांनी रॅली काढून जोरदार घोषणाबाजीही केली. बहुतांशी इच्छुकांसह समर्थकांनी नव्या चेहर्‍यांना संधी देण्याची मागणी  केली. कच्छी जैन भवन येथे भाजप इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या.  खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, रवि अनासपुरे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, नीता केळकर, प्रकाश बिरजे, दीपक शिंदे, दिलीप सूर्यवंशी, माजी आमदार दिनकर पाटील उपस्थितहोते.  

सकाळच्या सत्रात  प्रभाग क्रमांक 16, 14, 11, 15 या प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तर दुपारनंतर  दुसर्‍या सत्रात प्रभाग क्रमांक 17, 9, 10, 13, 12, 18 मधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी इच्छुकांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शनकेले. प्रभागापासून राम मंदिर चौकापर्यंत अनेक इच्छुकांनी मोटारसायकल रॅलीही काढली. यावेळी काही इच्छुक उघड्या गाड्यांमधून ढोल-ताशांच्या गजरात मुलाखतस्थळी आल्याचे दिसत होते. यावेळी त्यांच्या समर्थकांनी दिलेल्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. भाजपचे मफलर, टोप्या, भगवे मफलर, टोप्या घातलेले कार्यकर्ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. 

इच्छुकांच्या समर्थकांमध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. इच्छुकांमध्येही महिलांची अधिक संख्या होती. यावेळी पक्षासाठी केलेले काम, निष्ठा, सामाजिक कार्याची आवड अशा विविध निकषांवर उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्याशिवाय कामाची दखल घेत नव्या चेहर्‍यांना संधी देण्याचीही अनेकांनी मागणी केली. यावेळी पक्ष जे उमेदवार देईल त्या उमेदवारांच्या पाठीशी राहून पक्षाच्या विजयासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाहीही या इच्छुकांनी दिली. यावेळी इच्छुकांच्या समर्थकांनीही मते व्यक्त केली. यावेळी अनेकदा समर्थकांची लांबलचक भाषणे थांबवताना व्यासपीठावरील नेत्यांना हस्तक्षेप करावा लागत होता. मध्येच घोषणा देणार्‍या कार्यकर्त्यांना थांबण्याच्या सूचनाही वारंवार दिल्या जात होत्या.

मिरजेत आज मुलाखती होणार...

सांगली शहरातील इच्छुकांच्या रविवारी मुलाखती पूर्ण करण्यात आल्या. सोमवारी मिरजेतील पटवर्धन हॉलमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 19, 20 या प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, रवि अनासपुरे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, नीता केळकर, शेखर इनामदार आदी मुलाखत घेणार असल्याचे सांगण्यात आले. 

वाहतूक धीम्या गतीने...

शहरातील राम मंदिर चौकातील कच्छी जैन भवन येथे या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इच्छुक मोठ्या संख्येने समर्थकांसमवेत आले होते. त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने तसेच झालेल्या गर्दीमुळे दोन्ही रस्त्यावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. दुपारनंतर पोलिस बंदोबस्त वाढवल्यानंतर काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली. शिवाय कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे काहीकाळ वाहतूक ठप्पही झाली होती.