Sun, Jul 21, 2019 09:50होमपेज › Sangli › मिरजेत काँग्रेसमधून इच्छुकांचे जोरदार शक्‍तिप्रदर्शन

मिरजेत काँग्रेसमधून इच्छुकांचे जोरदार शक्‍तिप्रदर्शन

Published On: Jul 02 2018 1:48AM | Last Updated: Jul 01 2018 10:01PMमिरज : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी मिरज आणि कुपवाड मधील काँग्रेस मधून निवडणूक लढवू इच्छुणार्‍या उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान इच्छुकांनी समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन केले.मिरज व कुपवाड शहरातील प्रभाग क्र. 2, 3, 4, 5, 6,7 आणि 20 मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती येथे घेण्यात आल्या. मुलाखतीसाठी प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक अभय छाचड, प्रकाश सातपुते व माजी मंत्री आ. सतेज पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. विश्‍वजीत कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील, श्रीमती जयश्री पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, किशोर जामदार, प्रा. सिद्धार्थ जाधव इत्यादी उपस्थित होते. येथील पटपर्धन हॉलमध्ये या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मोटारसायकल रॅली तसेच सवाद्य  मिरवणुकीने येऊन आपले जोरदार शक्तीप्रदर्शन केले. व घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला. प्रस्तापित नगरसेवकांबरोबरच नव्या तसेच युवक, महिला उमेदवारांनीही शक्तीप्रदर्शन करण्यात कोणतीही कसूर ठेवली नव्हती.

मुलाखती मध्ये माजी महापौर किशोर जामदार, माजी उपमहापौर डॉ. राजेंद्र मेथे, नगसेवक संजय मेंढे, बबीता मेंढे, माजी नगरसेवक अजीत दोरकर, शहर जिल्हा महिला आघाडी प्रमुख वहीदा नायकवडी, महंमद मणेर, अकबर मोमीन, करण जामदार, धोंडुबाई कलगुटगी, अंकुश कोळेकर, आझम काझी, अ‍ॅड. बिलकीश बुजरुक, अ‍ॅड. प्रविणा हेटकाळे,  इत्यादींनी उमेदवारीची मागणी केली आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसमधील 8 ते 10 आजी, माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या प्रभागातील इच्छुक कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारीचा दावा केला आहे. परशुराम दोरकर या इच्छुकाने मलाच उमेदवारी द्यावी अन्यथा बंडखोरी करण्याचा इशारा दिला. अनेक इच्छुकांनी आपले समर्थक कार्यकर्ते आणले होते.

0मुलाखती दरम्यान एकावेळी अनेक प्रभागातील इच्छुक व समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे बराच गोंधळ उडाला होता. एका इच्छुक उमेदवाराला अनेकांचे समर्थन मिळत होते. त्यामुळे कोणत्या इच्छुकांचे किती समर्थक आहेत. हेच समजत नव्हते. त्यामुळे नेत्यांना इच्छुक उमेदवारांच्या मागे किती समर्थक आहेत. हे अजमावण्यासाठी कार्यकर्त्यांना हातवर करुन समर्थन देण्यास सांगितले. तेंव्हा मात्र मुलाखत दरम्यानची गर्दी कमी झाली.

1 इच्छुक, 1 समर्थक...

मुलाखतीस एक महिला इच्छुक उमेदवार केवळ एका समर्थकासह आली होती. मुलाखती दरम्यान आ. सतेज पाटील व विशाल पाटील यांनी तुमच्या कार्यकर्त्यांना हात वर करायला सांगा असे म्हटल्यावर केवळ एका समर्थकाने हातवर केले. त्यावर सतेज पाटील यांनी कार्यकर्ते कोठे आहेत असा प्रश्‍न केला असता त्या महिला इच्छुकाने कार्यकर्ते पाठीमागून येत आहेत असे सांगितले. यावर मुलाखती दरम्यान चांगलाच हशा पिकला.

मला बोलू द्या की...

मुलाखती दरम्यान काही इच्छुकांनी आपण काँग्रेस पक्षाचे 25 ते 30 वर्षापासून काम करीत आहे. असे सांगून विस्ताराने आढावा घेण्यास सुरुवात केली तेंव्हा नेत्यांनी इच्छुकांना थोडक्यात बोलण्यास सांगितले. तेंव्हा एका इच्छुकाने ‘मला बोलू द्या की’ असे सांगितले. तर अनेक जण काँग्रेस नेत्यांची स्तुती करताना दिसून येत होते.